एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:39+5:302021-05-09T04:07:39+5:30
उत्पन्न घटले : जून महिन्यात उपजीविकेचा प्रश्न नागपूर : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याचे बंधन महाराष्ट्र शासनाने घालून दिल्यामुळे ...
उत्पन्न घटले : जून महिन्यात उपजीविकेचा प्रश्न
नागपूर : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याचे बंधन महाराष्ट्र शासनाने घालून दिल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. त्यामुळे जून महिन्यात वेतन होणार की नाही याची चिंता एसटी कर्मचाऱ्यांना पडली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने २२ मार्च २०२० पासून १५ सप्टेंबर २०२० पर्यंत एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२० तसेच जानेवारी आणि १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती; परंतु त्यानंतर एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा निर्णय घेतल्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले होते. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्यात येत होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा १५ एप्रिल २०२१ पासून १ मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. हे लॉकडाऊन १५ मेपर्यंत वाढविण्यात आले. कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केवळ अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास करण्याचे बंधन महाराष्ट्र शासनाने घालून दिले. आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास जून महिन्याचे वेतन मिळणार की नाही, याची चिंता एसटी कर्मचाऱ्यांना पडली आहे.
..........
दोन हजार कोटींची मागणी
‘एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जून महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी एसटीकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे शासनाने एसटीला २ हजार कोटी देण्याची मागणी संघटनेने केली आहे.’
-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना
............