एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावतेय वेतनाची चिंता (डमीचा विषय)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:10+5:302021-05-27T04:07:10+5:30

नागपूर : लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या बस बंद आहेत. त्यामुळे जून महिन्यात ७ तारखेला होणारे वेतन मिळणार की नाही, अशी ...

Salary Concerns for ST Employees (Dummy Subject) | एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावतेय वेतनाची चिंता (डमीचा विषय)

एसटी कर्मचाऱ्यांना भेडसावतेय वेतनाची चिंता (डमीचा विषय)

Next

नागपूर : लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाच्या बस बंद आहेत. त्यामुळे जून महिन्यात ७ तारखेला होणारे वेतन मिळणार की नाही, अशी चिंता एसटीच्या कर्मचाऱ्यांना भेडसावत आहे.

मागील वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. काही दिवसांनंतर बस सुरू झाल्या; परंतु एका सीटवर एकच प्रवासी या राज्य शासनाच्या निर्णयामुळे एसटीच्या उत्पन्नावर मर्यादा आली. अशा स्थितीत राज्य शासनाकडे विविध सवलतींपोटी असलेली रक्कम मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटला. सध्या ३१ मे पर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे आणि अत्यावश्यक कारणासाठीच प्रवास या अटीमुळे एसटीचे प्रवासी कमी झाले आहेत. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती त्यामुळे डबघाईस आली आहे. त्यामुळे ७ जून रोजी होणारे वेतन मिळणार की नाही याची चिंता एसटीच्या कर्मचाऱ्यांना पडली आहे.

.................

जिल्ह्यातील एकूण आगार : गणेशपेठ, वर्धमाननगर, इमामवाडा, घाट रोड, सावनेर, काटोल, रामटेक, उमरेड

एकूण कर्मचारी : २७४९

थकबाकी : ग्रामपंचायत निवडणूक, विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक यासाठी पाठविलेल्या बसचे एकूण २.७० कोटी रुपये शिल्लक आहेत.

वेतनाची तरतूद करावी

‘एसटीचे उत्पन्न बंद असल्यामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळते की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटी महामंडळाने आधीच तरतूद करून कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची गरज आहे.’

-अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

वेतनावरच घर चालते

‘एसटीमध्ये काम करून येणाऱ्या वेतनावरच घर चालते. माझ्याकडे शेती नसल्यामुळे उत्पन्नाचा दुसरा मार्ग नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने वेतनाच्या पैशांची तरतूद करून कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.’

-शिवाजी राठोड, चालक

घर चालविण्याची चिंता

‘वेतन न मिळाल्यास घरखर्च कसा भागवावा, हा प्रश्न निर्माण होतो. किरायाच्या घरात राहत असल्यामुळे दर महिन्यात किरायाचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वेतन देण्यासाठी प्रयत्न करावा.’

-अजय बनसोड, वाहक

वेतनाची टांगती तलवार

‘नियमित काम करूनही दर महिन्यात वेतन मिळते की नाही याची चिंता राहते. वेतनाची टांगती तलवार कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर असते. शासनाने एसटी महामंडळाला आर्थिक मदत करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.’

-राहुल मेंढेकर, चालक

.........

Web Title: Salary Concerns for ST Employees (Dummy Subject)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.