महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळणार वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 09:30 PM2019-05-30T21:30:36+5:302019-05-30T21:31:48+5:30
कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचारी भविष्य निधी खात्यात कंपनी व कर्मचारी हिस्सा वेळेत जमा करणे तसेच पदोन्नती, बदली, निलंबन किंवा नव्या रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन योग्य वेळेत करण्यासाठी महावितरणमध्ये नवीन व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांमुळे महावितरणमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महावितरणने पदोन्नती किंवा बदलीने रुजू झालेल्या, कार्यमुक्त झालेल्या, निलंबित असलेल्या, नव्याने रुजू होणाºया, अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले असून अशा प्रकारातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी योग्य वेळेत वेतन अदा करण्यासाठी परिपत्रकाद्वारे निर्देश जारी केले आहेत. या परिपत्रकानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी कंपनीच्या संचालक मंडळाशी सल्लामसलत करून कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने कंपनीत नव्याने रुजू होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला महिन्याच्या १ ते १५ तारखेदरम्यान रुजू करून घेण्यात येऊन संबंधित कर्मचाऱ्याला त्वरित भविष्य निर्वाह निधी क्रमांक देऊन त्याला त्याच महिन्यात वेतन देण्यात यावे. कर्मचाऱ्यांचे मासिक पगार वेळेवर होण्यासाठी पदोन्नती अथवा बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्यमुक्त करण्यात यावे, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची बदली होण्यापूर्वीच्या कार्यालयात त्याचा नियमित पगार अदा करण्यात येईल व नवीन कार्यालयात देखील कर्मचारी रुजू झाल्यावर त्याचा नियमित पगार वेळीच देणे शक्य होणार आहे. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्याच्या कार्यमुक्तीच्या आदेशामध्ये त्याची वेतनश्रेणी, मूळ पगार, घरभाडे भत्ता याची पूर्ण माहिती दिल्या जाईल यामुळे नवीन कार्यालयात रुजू होतेवेळी ही सर्व माहिती संबंधित कर्मचाऱ्याच्या नवीन कार्यालयात सहजरीत्या उपलब्ध होईल.
अपवादात्मक स्थितीत रजा अर्ज सादर न करता अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनाही या परिपत्रकानुसार दिलासा देण्यात आला असून कंपनीच्या सेवेत असताना निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधी दरम्यान देय असलेल्या निलंबन भत्त्यातून त्याच्या भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा वजा करून ती रक्कम भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन निधीत निर्धारित कालावधीत जमा करण्यात यावी, यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबन भत्ता प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपूर्वी अदा करण्याच्या सूचना सर्व संबंधित विभागांना या परिपत्रकातून देण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या या परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांना पगार वेळीच मिळण्यात मदत होणार असून भविष्य निर्वाह निधीचा भरणा वेळीच होऊन भविष्य निर्वाह निधीचा भरणा उशिराने झाल्याने भरावयास लागणारे व्याज आणि दंड टाळता येणार आहे.