गटशिक्षण अधिकाऱ्याने अडविले वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:10 AM2021-02-28T04:10:04+5:302021-02-28T04:10:04+5:30
नागपूर : रामटेक पंचायत समितींतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी संपत असतानाही झाले नाही. यासाठी पं.स.च्या ...
नागपूर : रामटेक पंचायत समितींतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन फेब्रुवारी संपत असतानाही झाले नाही. यासाठी पं.स.च्या गटशिक्षण अधिकारी जबाबदार असल्याची ओरड शिक्षकांच्या संघटनांनी केली आहे.
शिक्षकांचे पगार दरमहा १ तारखेला व्हावे, अशी नित्याचीच मागणी असते. परंतु फेब्रुवारी महिना उलटला तरी जानेवारीचे वेतन शिक्षकांना मिळाले नाही. त्यामुळे शिक्षक संघटना व शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. पं.स.ला पगाराचा निधी प्राप्त झाल्यावर एक दिवसात शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होणे आवश्यक असताना, निधी उपलब्ध होऊन आठवडा उलटला तरी शिक्षकांचे पगार त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले नाही. तर एकस्तर वेतनश्रेणी लागू झालेल्या शिक्षकांची थकबाकी अदा करण्यावरूनसुद्धा गटशिक्षण अधिकारी व शिक्षकांमध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे. यासंदर्भात गटशिक्षण अधिकारी संगीता तभाने यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, पंचायत समिती रामटेकमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. शिवाय इन्कमटॅक्सचा महिना असल्यामुळे वेतन बिल टाकण्यात थोडा उशीर झाला. शिवाय शिक्षकांनी एकस्तर बिल काढण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. ते बिल काढण्यात आमचा १० दिवसाचा वेळ गेला. पण पुढच्या महिन्यात शिक्षकांचे वेतन होऊन जाईल. सोमवारी शिक्षकांच्या वेतनाचे बिल टाकण्यात येईल.