नागपुरातील अपत्यसुखाच्या लालसेने बनविले आरोपी; चिमुकलीचे विक्री प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 09:15 PM2017-12-09T21:15:10+5:302017-12-09T21:15:28+5:30
कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता नवजात चिमुकलीला विकत घेणे एका सुशिक्षित दाम्पत्याच्या अंगलट आले. अपत्यसुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याविरुद्धही धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
अमरावती मार्गावर राहणारा आणि मोलमजुरी करणारा अविनाश बारसागडे याची पत्नी मोना हिने २२ डिसेंबरला मेडिकलमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. तिच्या जन्माला येणाऱ्या अपत्यावर आठ महिन्यांपासून नजर ठेवून असलेली भारती नामक महिला दलाल तसेच हर्षा आणि मनीष मुंधडा या दाम्पत्याने दुसऱ्याच दिवशी मोनाच्या कुशीतून तिच्या नवजात चिमुकलीला ताब्यात घेतले आणि तिच्या हातात थोडीशी रक्कम कोंबून तिला गप्प केले. दुसरीकडे १८ वर्षांपासून अपत्यसुखासाठी आसुसलेले सोनेगावचे एक सुशिक्षित दाम्पत्य आरोपी मुंधडा दाम्पत्याच्या संपर्कात होते. सरोगसी सेंटर चालविण्याचा बनाव करणाऱ्या मुंधडा दाम्पत्याने सोनेगावच्या या अभियंत्याला त्याच्या पत्नीसह आधीच बाळ देण्याचा सौदा पक्का केला होता. या दाम्पत्याच्या भावनिक विवशतेचा गैरफायदा घेत त्यांना मोना आणि अविनाश बारसागडेची चिमुकली दिली. त्याबदल्यात त्यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये घेतले. अनेक वर्षांनंतर अपत्यसुख मिळाल्याने अभियंता आणि त्याच्या पत्नीने चिमुकलीला घरी नेले. अवघ्या १२ दिवसातच ही चिमुकली त्यांच्या काळजाचा तुकडा बनली. तिच्यासह भविष्याच्या वेगवेगळ्या कल्पना रंगविणाऱ्या या दाम्पत्याला गुरुवारी ७ नोव्हेंबरला जबर मानसिक धक्का बसला. मुंधडा दाम्पत्याने सरोगसीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून त्यांना ही चिमुकली विकल्याचे स्पष्ट झाले. धंतोली पोलिसांनी याप्रकरणी मुंधडा दाम्पत्याला अटक केल्याचेही वृत्तपत्रातून त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून चिमुकलीला धंतोली पोलिसांच्या माध्यमातून मोनाला सोपविले. दरम्यान, चिमुकलीच्या खरेदी-विक्री प्रकरणात तांत्रिकदृष्ट्या अभियंता आणि त्याची पत्नी हे देखील आरोपी बनत असल्याने पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर या दाम्पत्यापैकी अभियंत्याला अटक केली.