बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपुरात कोट्यवधींच्या शेतीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:20 PM2020-02-24T12:20:41+5:302020-02-24T12:22:01+5:30

झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Sale of crores of land in Nagpur on the basis of fake documents | बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपुरात कोट्यवधींच्या शेतीची विक्री

बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपुरात कोट्यवधींच्या शेतीची विक्री

Next
ठळक मुद्दे आरोपी फरार, पोलिसांची शोधाशोधकळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झारखंडमधील एका व्यक्तीने सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या शेत जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून ती शेती परस्पर दुसऱ्याला विकणाऱ्या आरोपीविरुद्ध कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. तो जगदीशनगर (काटोल मार्ग) मधील कालिमाता नगरात राहतो. प्रेमशंकर सीताराम चौधरी (वय ६५) हे शनी मंदिरजवळ रांची (झारखंड) येथे राहतात. त्यांचा पुतण्या अखिलेश प्रयागराज चौधरी येथील वर्धमाननगरातील श्रीजी दर्शन अपार्टमेंटमध्ये राहतो. अखिलेश यांनी मौजा पावनगाव (ता. कामठी) येथील उमेश श्रावण पिंपळखेडे, विकास श्रावण पिंपळखेडे आणि मनोज श्रावण पिंपळखेडे यांची शेती (क्र. ४९, खसरा नं. ५१/ १) खरेदी केले होते. तेव्हापासून शेतीची मालकी अखिलेश चौधरी यांच्याकडे होती. २०१४ मध्ये प्रेमशंकर चौधरी झारखंडमधून नागपुरात आले. त्यांनी ही शेती त्यावेळी पुतण्याकडून बघितली अन् विकत घेतली. २७ लाख, ५१ हजारात हा सौदा झाला अन् त्याचे रीतसर विक्रीपत्रही करण्यात आले.
शेषनाथ जोगेश्वरसिंग ठाकूर या आरोपीने अलिकडे जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती जमीन संबंध नसताना सुनील बोरकर यांना विकली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रदीर्घ चौकशीनंतर पीएसआय पाटवदकर यांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले असून, त्यांनी आपल्या बचावासाठी काही दलाल कामी लावल्याची चर्चा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ठाकूर हा ७५ वर्षांचा आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस शनिवारी त्याच्या घरी गेले होते. मात्र, तो आढळला नाही.

मोठी टोळी सहभागी
या प्रकरणात पोलिसांनी तूर्त एकच आरोपी बनविला आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात एक मोठी टोळीच सहभागी असल्याची चर्चा आहे. या टोळीने अशा प्रकारे कोट्यवधींच्या अनेक जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे जमीन विकून या टोळीतील प्रत्येकाने कोट्यवधी रुपये गिळंकृत केले. वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची कसून तपासणी झाल्यास भूमाफियांशी साटेलोटे असलेले एक रॅकेटच पोलिसांच्या हाती लागू शकते, अशीही चर्चा आहे.

Web Title: Sale of crores of land in Nagpur on the basis of fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.