नागपुरात घाण वातावरणात खाद्यपदार्थांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:19 AM2019-07-11T00:19:47+5:302019-07-11T00:21:00+5:30
उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत कुठलीच खबरदारी न घेता खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. याचा ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडूनही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेळ राजरोसपणे सुरू आहे. ‘लोकमत’ने बुधवारी रामनगर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉलला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांकडून स्वच्छतेबाबत कुठलीच खबरदारी न घेता खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येत आहे. याचा ग्राहकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. याबाबत शासकीय यंत्रणेकडूनही संबंधित विक्रेत्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेळ राजरोसपणे सुरू आहे. ‘लोकमत’ने बुधवारी रामनगर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉलला भेट दिली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
पोह्यांच्या शेजारी मांडली डस्टबीन
रामनगर चौकात रामनगरच्या गेटच्या शेजारी दिलीप शेंडे टी स्टॉल आहे. या स्टॉलवाल्याने पोहे ठेवलेल्या पातेल्याच्या शेजारीच डस्टबीन ठेवली होती. त्यामुळे डस्टबीनमधील माशा पोह्यांवर घोंगावत होत्या. स्टॉलच्या सभोवताल माशा दिसल्या. ग्राहक पोहे खाल्ल्यानंतर प्लेट बाजूला ठेवत होते. तेथे प्लेट जमा होऊन त्यावरही माशा घोंगावत होत्या. प्लेट धुण्यासाठीही एका कॅरेटमध्ये पाणी ठेवलेले होते. ग्राहकांनी ठेवलेल्या प्लेट या पाण्यातून एकदा काढल्या की त्या दुसऱ्या ग्राहकांना देण्यात येत होत्या. साध्या ड्रममध्ये पाणी भरून ग्राहकांना पिण्यासाठी ठेवले होते. परंतु हे पाणी किती शुद्ध आहे याबाबतही काहीच कळायला मार्ग नव्हता.
सगळे खाद्यपदार्थ उघडे
रामनगर ते रविनगर चौकाकडे जाताना डाव्या बाजूला सैलानी मुंग पकोडेवाला आहे. येथे मुंगभजे, कांदाभजे, मिरचीभजे, आलुभजे, ब्रेडपकोडा, वडापाव, साबुदाणा विक्रीसाठी ठेवले होते. परंतु हे खाद्यपदार्थ काचबंद किंवा डब्यात नव्हते, तर ते उघडे ठेवलेले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांमुळे उडणारी धूळ या खाद्यपदार्थांवर सहज उडून जाऊ शकत होती. या स्टॉलवरील खाद्यपदार्थांवर माशा घोंगावताना दिसल्या. परंतु या माशा हटविण्यासाठी काहीच उपाययोजना दिसली नाही. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी घरगुती सिलिंडरचा वापर येथे होताना दिसला. दुकानदाराने उघड्यावर घरगुती वापराचे सिलिंडर ठेवलेले होते. दुकानातील कचराही बाजूलाच असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ टाकण्यात येत होता. त्यामुळे या झाडाजवळही कचरा साचल्याचे दृश्य दिसले.
गडरलाईनच्या शेजारी नाश्त्याची विक्री
रामनगर चौकातच कमल चहा-नाश्ता, चणा पोह्याचा स्टॉल आहे. या स्टॉलच्या समोरच तुंबलेली गडरलाईन आहे. या गडरलाईनचे झाकण तुटलेले असल्यामुळे त्यात आजूबाजूचे नागरिक कचरा टाकतात. गडरलाईनच्या चेंबरमध्ये कचरा, दारूच्या बॉटल साचलेल्या दिसल्या. येथेच नाश्त्याचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलवरही पोहे उघड्यावर ठेवलेले दिसले. चहा बनविण्यासाठी वापरलेले दुधाचे पाकीट खाली एका भांड्यात टाकण्यात आले होते. या दुधाच्या पाकिटावरही माशा घोंगावत होत्या. स्टॉलच्या बाजूलाही कचरा साचलेला होता. पोहा देताना प्लेट खाली पडल्यामुळे तेथे पोहे आणि चणे सांडले होते. ते सुद्धा स्वच्छ करण्याची तसदी या दुकानदाराने घेतली नाही. बाजूलाच गाय चरत होती. अशा घाण वातावरणात ग्राहकांना नाश्ता देणे सुरू होते.