बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची विक्री : दुय्यम निबंधकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 09:04 PM2019-03-01T21:04:23+5:302019-03-01T21:06:06+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेपाच कोटींच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये ही विक्री प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या दुय्यम निबंधकाचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेपाच कोटींच्या जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या आठ आरोपींविरुद्ध मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये ही विक्री प्रक्रिया पूर्ण करून देणाऱ्या दुय्यम निबंधकाचाही समावेश आहे.
सोनबा गुलाबराव मुसळे (वय ६१, रा. सुभाष रोड, द्रोणाचार्यनगर) यांनी मानकापूरमधील खसरा क्रमांक २८१५ मध्ये १२ क्रमांकाचा भूखंड खरेदी केला होता. या जमिनीचे मूळमालक श्यामराव भगवान रोहणकर आणि त्यांचे वारस अरुण श्यामराव रोहणकर यांच्यासोबत खरेदीविक्रीचा व्यवहार करून २० फेब्रुवारी २०१३ रोजी त्यासंबंधीची रितसर नोंदणीही केली होती. श्यामराव रोहणकर यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी रमण राधेश्याम शिरोया (रा. सूर्यनगर पारडी) याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी तयार करून घेतली. त्यानंतर हा भूखंड आरोपी सैफुद्दीन इस्माईल टोपीवाला याला विकला. आरोपींनी त्यासाठी ६ सप्टेंबर २००५ चे खरेदी खत बनविले आणि या भूखंडावर अतिक्रमण (कब्जा) केले. या गुन्ह्यात आरोपी शिरोया आणि सैफूद्दीनला शब्बीर हुसेन इस्माईल टोपीवाला, अब्बूबकर हाजी अब्दुल मजिद (रा. मानकापूर) सदाकत हुसेन लियाकत हुसेन (रा. कळमना), शादाब (रा. मानकापूर) तेव्हाचे दुय्यम निबंधक आणि अन्य एका आरोपीने या बनवेगिरीत सहभाग नोंदवला. दरम्यान, मुसळे यांनी आपली मूळ कागदपत्रे दाखवून त्यासंबंधाने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. सविस्तर चौकशी केल्यानंतर मानकापूर पोलिसांनी विविध कलमानुसार उपरोक्त आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.