नागपुरात औषधी दुकानातून दारूची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:50 PM2020-04-15T21:50:03+5:302020-04-15T21:51:17+5:30

काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला.

Sale of liquor from drugstore in Nagpur | नागपुरात औषधी दुकानातून दारूची विक्री

नागपुरात औषधी दुकानातून दारूची विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देमेयो रुग्णालय चौकात धाड : संचालकाला रंगेहात अटक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : जीवनावश्यक असल्याने नागरिकांना औषधांचा तुटवडा भासू नये म्हणून टाळेबंदीमधून औषधी दुकानांना वगळण्यात आले आहे. मात्र याचा फायदा घेत काही औषधी विक्रेते दुकानातून दारूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर गणेशपेठ येथील एका मेडिकल स्टोअर्सवर धाड टाकून हा दारूविक्रीचा अड्डा पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी औषधी दुकानाचे संचालक दोसरभवन चौक निवासी निशांत ऊर्फ बंटी प्रमोद गुप्ता (३६) या आरोपीला अटक केली आहे. त्याचा सहकारी नरेश गुप्ता फरार झाला. बंटी गुप्ताचे मेयो रुग्णालय चौकात कंचन मेडिकल स्टोअर्स म्हणून औषधाचे दुकान आहे. फरार असलेला नरेश गुप्ता हा त्याचा नातेवाईक आहे. औषधी दुकानाच्या शेजारीच नरेश गुप्ताचे बीअरबार आणि हॉटेलही आहे. राज्यात १८ मार्चपासून टाळेबंदी लागल्यानंतर दारूची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. यामुळे नरेशचे बीअरबारही बंद आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेशने शेजारीच असलेल्या बंटीच्या औषधी दुकानाचा फायदा घेत तिथून दारूविक्री सुरू केली. बंटीने दुकानासमोर बॉटलबंद पाण्याचे बॉक्स ठेवले होते. याच बॉक्समध्ये बीअर ठेवली होती. या दुकानातून ओळखीच्या ग्राहकांना दुप्पट किमतीने बीअरची विक्री करीत होता. बॉक्समध्ये पाण्याच्या बॉटल्सच्या मधे बीअर ठेवली असल्याने नरेश आणि बंटीच्या या युक्तीबाबत कुणाला कळत नव्हते. बंटी आपल्या विश्वासू ग्राहकांनाच बीअरची विक्री करीत होता. गणेशपेठ पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली. याच माहितीद्वारे पोलिसांनी बंटीच्या औषधी दुकानावर धाड टाकली व पाण्याच्या बॉक्समधून बीअरच्या ९० बॉटल जप्त केल्या. पोलिसांनी आरोपी बंटीलाही ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर नरेशबाबत माहिती मिळाली. कारवाईची माहिती मिळताच नरेश फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नरेशचा बार कायमच अवैध विक्रीसाठी चर्चेत असतो. त्याच्या विरोधात वेळोवेळी कारवाईसुद्धा झाली आहे. कारवाईनंतर पोलीस आणि प्रशासनावर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातो. या कारवाईच्या वेळीही असा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गणेशपेठ पोलिसांनी यावेळी आरोपींची डाळ शिजू दिली नाही. या कारवाईबाबत महसूल विभाग व अन्न व औषधी विभागाला माहिती देण्यात आली. आरोपींचे औषधी दुकान आणि बीअरबारचा परवाना रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

थांबत नाही दारूची तस्करी
मेयो रुग्णालयाजवळ अवैध दारूतस्करीचा मोठा अड्डा चालत असल्याची माहिती आहे. लोकमतने वेळोवेळी याबाबत माहितीही प्रकाशित केली आहे. येथून दररोज मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित जिल्हे आणि अवैध अड्ड्यावर दारूची तस्करी केली जाते. दोन महिन्यांपूर्वीच येथील एका दारूविक्रेत्याला तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. तरीही अवैध विक्री थांबत नसल्याचे दिसून येते. पोलीस आणि महसूल विभागातर्फे कठोर कारवाई केली जात नसल्यानेच ही अवस्था असल्याचे बोलले जाते. महसूल विभाग आरोपींचा परवाना रद्द करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही केला जातो.

Web Title: Sale of liquor from drugstore in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.