चक्क किराणा दुकानात ‘ई-सिगारेट्स’ची विक्री; ३० हजारांहून अधिकचा माल जप्त
By योगेश पांडे | Published: May 18, 2023 05:05 PM2023-05-18T17:05:07+5:302023-05-18T17:05:47+5:30
Nagpur News उपराजधानीत मागील काही दिवसांपासून ‘ई-सिगारेट्स’च्या विक्रीचे प्रमाण वाढले असून विविध पानठेले, कॅफेमध्ये याची विक्री होत आहे. बजाजनगरात तर चक्क किराणा दुकानातून प्रतिबंधित ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.
योगेश पांडे
नागपूर : उपराजधानीत मागील काही दिवसांपासून ‘ई-सिगारेट्स’च्या विक्रीचे प्रमाण वाढले असून विविध पानठेले, कॅफेमध्ये याची विक्री होत आहे. बजाजनगरात तर चक्क किराणा दुकानातून प्रतिबंधित ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करून ३० हजारांहून अधिकचा माल जप्त केला आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
बजाजनगर चौकाजवळील हरीष किराणा येथे ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. युनिट एकच्या पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विक्रीस बंदी असलेल्या ‘ई-सिगारेट्स’चा साठा आढळून आला. पोलिसांनी आरोपी राजकुमार मुरलीधर ढोक (२२, निलकमल सोसायटी, बजाजनगर) याच्याविरोधात ईलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याला बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.