‘ॲप्पल’च्या ‘दुप्पल’चा ८७.५९ लाखांचा माल जप्त; चार दुकानांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 03:15 PM2023-08-31T15:15:09+5:302023-08-31T15:16:43+5:30
नागपुरात मोठ्या प्रमाणावर बनावट प्राॅडक्ट्सची विक्री
नागपूर : ‘ॲप्पल’च्या नावाखाली बनावट प्राॅडक्ट्सची विक्री करणाऱ्या आणखी एका रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी शहरातील विविध दुकानांमध्ये धाडी टाकत तब्बल ८७.५९ लाखांचा बनावट माल जप्त केला. ‘लोकमत’ने या महागड्या ब्रॅंडच्या नावाने डुप्लिकेट प्राॅडक्ट्स विकली जात असल्याच्या प्रकरणावर सर्वात अगोदर प्रकाश टाकला होता.
नागपुरात मोठ्या प्रमाणावर ॲप्पलच्या बनावट प्राॅडक्ट्सची विक्री होती व अगदी रस्त्यावर उभे राहूनदेखील काही लोक यांची विक्री करतात, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यानंतर ॲप्पलकडून अशा बनावट मालविक्री प्रकरणांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीचे अधिकारी सक्रिय झाले. नागपुरात येऊन त्यांनी पाहणी केली असता, अनेक ठिकाणी असा प्रकार सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबत सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. मंगळवारी पोलिसांनी सीताबर्डीतील व्हाइट हाऊस, गणेश मोबाइल, प्रथम मोबाइल तसेच लक्ष्मीनारायण मोबाइल शॉपवर धाड टाकली. व्हाइट हाऊस मोबाइल शॉपचा मालक अजय शीतलदास माखिजानी (४३, रा. जरीपटका) याच्या दुकानातून ४३.४७ लाखांचा माल, गणेश मोबाइलचा मालक भूषण राधाकिशन गेहानी (५२, रा. सेतिया चौक, जरीपटका) याच्याकडून ५.९० लाखांचा माल, प्रथम मोबाइलचा मालक मनोज रमेशलाल धनराजानी (४९, रा. कुंभ कॉलनी, जरीपटका) याच्या दुकानातून १४.७८ लाखांचा माल व लक्ष्मीनारायण मोबाइलचा साहील विनोदकुमार बजाज (२१, रा. दयानंद पार्क, जरीपटका) याच्याकडून २३.४३ लाखांचा बनावट माल जप्त करण्यात आला.
चारही दुकानांमध्ये मिळून ८७.५९ लाखांचा बनावट माल जप्त करण्यात आला. यात आयफोन, चार्जर, ॲडाॅप्टर, युएसबी केबल, एअरपॉड्स, कव्हर, मॅकबुक यांचा समावेश होता. कंपनीचे अधिकारी यशवंत मोहिते (नवी मुंबई) यांच्या तक्रारीवरून चारही आरोपींविरोधात सीताबर्डी पोलिस ठाण्यात प्रतिलिपी अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलिस निरीक्षक गेडाम, संतोष कदम, विनोद तिवारी, आबा मुंडे, चंद्रशेखर, प्रीतम, धीरज यांच्या पथकाने ही कारवाई केली.