विधवेच्या गरिबीचा फायदा घेत चार दिवसांच्या मुलीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 07:45 AM2022-11-29T07:45:00+5:302022-11-29T07:45:06+5:30
Nagpur News श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची मुलगी विकल्याची बाब समोर आली.
योगेश पांडे
नागपूर : बाळांच्या खरेदी-विक्रीच्या रॅकेटमध्ये दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. अटकेत असलेली श्वेता उर्फ आयेशा खान तसेच सचिन पाटील या आरोपींच्या चौकशीदरम्यान त्यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दांपत्याला सप्टेंबर महिन्यात चार दिवसांची मुलगी विकल्याची बाब समोर आली. एका विधवेच्या गरीबीचा फायदा घेत त्यांनी तिला जाळ्यात ओढले व संबंधित दांपत्याला २ लाख ९० हजारांत विक्री केली.
बाळांच्या खरेदी-विक्रीत श्वेता खानने विविध राज्यांत सौदे केले होते. छत्तीसगड, तेलंगाणा, गोंदिया येथील प्रकरणे समोर आली व पोलिसांनी संबंधित मुलांची सुटकादेखील केली. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी अहमदाबाद येथे एका नवजात मुलीची विक्री केल्याची माहिती दिली. पैशांची गरज असलेली एक गर्भवती विधवा सचिन पाटीलच्या संपर्कात आली होती. अनैतिक संबंधातून ती गर्भवती झाली होती. सचिनने तिच्या गरजेचा फायदा घेतला व तिला बालाघाट येथे दोन महिने घेऊन गेला. तिथेच तिची प्रसुती झाली. यादरम्यान त्याने व श्वेताने अहमदाबाद येथील विशाल चंदनानी यांची बहीण मोनिका सुलतीयानी व जावई विजय यांना ८ सप्टेंबर रोजी बाळाची विक्री केली. दत्तक प्रक्रिया पूर्ण केल्यावरच ताबा देत असल्याची थाप श्वेताने मारली होती. इतकेच नव्हे तर मुलीचे जन्म प्रमाणपत्र व इतर दस्तावेज पाठविण्यात येईल, असे आश्वासनदेखील दिले होते. मात्र त्यानंतर श्वेता व सचिनने आपले फोन बंद केले.
या खुलाशानंतर पोलिसांनी श्वेता व सचिनसह श्वेताचा पती मकबूल खान, डॉ.प्रवीण सिंग बायस, विशाल चंदनानी, मोनिका सुलतयानी व विनय सुलतयानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुलीची बडोदा येथून सुटका केली असून तिघांनाही ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूत प्रतिबंधक कक्षातर्फे ही कारवाई करण्यात आली.
डिप्रेशनमध्ये गेली होती विकत घेणारी महिला
विनय सुलतयानीचा अहमदाबादमध्ये डेकोरेशनचा व्यवसाय आहे. दोघांनाही मुल होत नसल्याने त्यांनी आयव्हीएफ प्रक्रिया केली होती. त्यानंतर मोनिकाला गर्भवती झाली होती. १५ मार्च रोजी तिला मुलगीदेखील झाली. मात्र चार महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. यानंतर मोनिका डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हापासून नातेवाईक दत्तक मुलगा किंवा मुलीचा शोध घेत होते. एका दूरच्या नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांना सचिन पाटीलचा क्रमांक मिळाला होता. सुरुवातीला बोलणी झाल्यावर ती फिस्कटली होती. मात्र सिंधी कुटुंबातील एक मुलगी दत्तक द्यायची आहे अशी श्वेताने थाप मारून सौदा ठरविला होता. नागपुरातील महाकाळकर भवन येथील एका इस्पितळात पुढील सौदा झाला होता. मुलीला घेण्यासाठी गुजरातमधील तिनही आरोपी विमानाने नागपुरात आले होते.