रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल
By नरेश डोंगरे | Published: June 2, 2024 09:16 PM2024-06-02T21:16:32+5:302024-06-02T21:16:56+5:30
महिनाभरात रेल्वेची कारवाई : मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरखपूर एक्स्प्रेसमधील बिर्याणी प्रकरण तापल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिनाभरात रेल्वेत खानपानाच्या चिजवस्तू विकणाऱ्यांना चांगलेच टाइट केले आहे. या पार्श्वभूमीवर, परवानगी नसताना विविध खाद्यपदार्थ तसेच पेय विकणाऱ्या ६५२ जणांना कारवाईचा दणका दिला आहे.
महिनाभरापूर्वी गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या ७० जणांना बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून घेतलेली बिर्याणी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणाचे पडसाद सर्वदूर उमटल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. विविध रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये अनधिकृत व्हेंडर्सचा सुळसुळाट झाल्याचे ध्यानात घेऊन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कडक भूमिका घेऊन रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर चालणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १ मे पासून ठिकठिकाणी कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली.
प्रवाशांच्या आरोग्यास पोषक आणि दर्जेदार खानपान सेवा देण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील पँट्री कार आणि कॅटरिंग स्टॉल्सची कसून तपासणी सुरू झाली. या कारवाईत दर्जाहीन अन् परवानगी नसणारे पदार्थ, पाणी तसेच ६५२ अनधिकृत विक्रेते आढळले. अनिमियतता बाळगणाऱ्या १४४ पॅन्ट्री कारच्या चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडापोटी २७.४५ लाख रुपये वसूल करण्यात आले.
ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न करणाऱ्या ८३ कॅटरिंग स्टॉल्सवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेत नीर पाण्याच्या बाटलीशिवाय दुसऱ्या पाणी बॉटल्स विकण्यात मनाई असूनही दुसऱ्याच पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे तपासणीत उघड झाले. अशा २६८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. लेबल (स्टिकर) शिवाय विकली जाणारी खाद्यपदार्थांची १२२ पाकिटेही जप्त करण्यात आली.
प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध : मित्तल
प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती मिळावी. तसेच त्यांना दर्जेदार खाद्यपदार्थ, पेय आणि पिण्याचे पाणी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे. अनधिकृत विक्रेत्यांमुळे आरोग्यास अपायकारक पदार्थ विकले जाऊ नये आणि प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ती यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कळविले आहे.