मनपाकडून विनापरवानगी सांडपाण्याची विक्री
By admin | Published: December 24, 2015 03:29 AM2015-12-24T03:29:01+5:302015-12-24T03:29:01+5:30
प्रक्रिया केलेले सांडपाणी महाजनकोला विकण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला शासनाने मान्यता दिलेली नाही.
मनपाला नोटीस : रक्कम वसूल करणार
नागपूर : प्रक्रिया केलेले सांडपाणी महाजनकोला विकण्यासाठी नागपूर महानगरपालिकेला शासनाने मान्यता दिलेली नाही. तथापि, नागपूर महानगरपालिकेने जलसंपदा विभागाच्या मान्यतेशिवाय महाजनकोला सांडपाणी विकण्याचा करार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरून महापालिकेला पत्राद्वारे कळविण्यात आले असून वेळ पडली तर महापालिकेकडून वसुलीही केली जाईल, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले. देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन बोलत होते. पाणी वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर महापालिकेचा हक्क राहत नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ अंतर्गत कलम ११ नुसार सांडपाण्याचा वापर सिंचनासाठी अथवा अन्य कोणत्याही कायार्साठी करण्याचा अधिकार जलसंपदा विभागाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.शासनाच्या मान्यतेशिवाय नागपूर महानगरपालिकेने सांडपाणी महाजनकोला विकले होते. त्यासंबंधी पत्राद्वारे कळविण्यात आले असून कार्यवाही चालू आहे. नागपूर मनपा २००८ पासून पाणी विकत आहे, तेव्हा त्यांच्याकडून वसुली करणार का, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला असता वसुलीही करणार असे महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)