सलील देशमुखांना दोन मिनीट उशीर झाल्याने अर्ज भरणे हुकले
By कमलेश वानखेडे | Published: October 28, 2024 06:12 PM2024-10-28T18:12:13+5:302024-10-28T18:14:28+5:30
रॅलीमुळे उशीरा पोहचले : मंगळवारी भरणार अर्ज
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सलील देशमुख सोमवारी सकाळी रॅलीने निघाले. मात्र, रॅलीत बराच वेळ गेला व अर्ज भरण्यासाठी उपविभागीय कार्यालयात पोहचले तेव्हा दोन मिनीट उशीर झाला होता. त्यामुळे ते अर्ज भरू शकले नाही. आता मंगळवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करतील.
विशेष म्हणजे २०१९ मध्ये सलील यांचे वडील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतही असाच किस्सा घडला होता. त्यामुळे त्यांनीही दुसऱ्या दिवशी जाऊन अर्ज सादर केला होता. सलील रॅलीने अर्ज दाखल करण्यासाठी निघाले. तीन वाजायला काही मिनीटे उरली असताना त्यांच्या लक्षात आले की आता रॅलीने वेळेत पोहचणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीवर बसून कार्यालय गाठले. पण तोवर दोन मिनीटे उशीर झाला होता. यानंतर सलील देशमुख यांनी मंगळवारी आई-वडील आणि मित्र पक्षांच्या नेत्यांसह येऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले.
मी लढलो असतो तर माझ्यावर केसेस लावल्या असत्या : अनिल देशमुख
माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावून मला १४ महिने तुरुंगात डांबण्यात आले. माझ्यासोबत घडलेल्या घटनाक्रमावर मी पुस्तक लिहिले असून ते दोन दिवसात येईल. मी पुन्हा निवडणूक लढलो असतो तर माझ्यावर आणखी खोट्या केसेस लावण्यात आल्या असत्या. त्यामुळे मी स्वत: न लढता पूत्र सलील यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केला. शरद पवार हे आपल्याला विधान परिषदेवर घेतील. महाविकास आघाडीचे सरकार येताच मंत्रीही करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.