सलून चालकाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:09 AM2021-04-28T04:09:41+5:302021-04-28T04:09:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सैराट झालेल्या गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे सैराट झालेल्या गुन्हेगारांनी परिसरात हैदोस घालणे सुरू केले आहे. मंगळवारी रात्री पुन्हा काही गुन्हेगारांनी एका सलून चालकाला चाकूने भोसकून ठार मारले. गेल्या आठ दिवसातील पाचपावलीत घडलेली हत्येची ही तिसरी घटना असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सोबतच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रूपेश मुरलीधर कुंभारे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून तो पाचपावलीत सलून चालवत होता, अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. खैरीपुरा रेल्वेलाईन जवळ काही गुन्हेगारांनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली आणि पळून गेले. मंगळवारी रात्री १०.२० च्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त लोहित मतानी तसेच पाचपावली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी रूपेशचा मृतदेह रुग्णालयात पाठवला आणि आरोपींना पकडण्यासाठी धावपळ सुरू केली.
सात दिवसांपूर्वी तांडापेठ परिसरात पिंकी वर्मा नावाच्या तरुणीची त्या भागातील गुन्हेगारांनी अमानुष हत्या केली होती. या घटनेनंतर पुन्हा रविवारी रात्री कुख्यात गुंड इंदल बेलपारधी याची त्याच्या जुगार अड्ड्यावर काम करणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांनी हत्या केली. आता परत आज रात्री सलूनवाल्याची हत्या झाली. यामुळे या भागात पोलीस नेमके काय करतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरे म्हणजे, गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचे पाचपावलीच्या या गुन्ह्यांमुळे स्पष्ट झाले आहे.
--
सीपींचा अल्टिमेटम
विशेष म्हणजे, पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंकी वर्मा आणि इंदल बेलपारधीची हत्या झाल्यानंतर लोकमतने त्या भागातील गुन्हेगार आणि पाचपावली पोलिसांचे साटेलोटे उघड करणारे वृत्त प्रकाशित केले. त्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी रात्री पाचपावली पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. यापुढे कोणताही गंभीर गुन्हा झाल्याचे खपवून घेतले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा देतानाच डिटेक्शन ब्रांच १० मिनिटात बरखास्त करा, असे आदेश ठाणेदाराला दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास का-कू सुरू असतानाच रूपेश कुंभारेची हत्या झाली. त्यामुळे पाचपावली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून पुढे आली आहे.
---