निर्बंध झुगारून नागपुरातील सलून व्यावसायिकांनी दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:04+5:302021-06-03T04:07:04+5:30
नागपूर : मागील तीन महिन्यांपासून नागपुरात आणि ग्रामीण भागात बंद असलेली सलून दुकाने बुधवारी एकजूट दाखवत सलून दुकानदारांनी उघडली. ...
नागपूर : मागील तीन महिन्यांपासून नागपुरात आणि ग्रामीण भागात बंद असलेली सलून दुकाने बुधवारी एकजूट दाखवत सलून दुकानदारांनी उघडली. शासनाचे निर्बंध असले तरी ‘कुटुंबाच्या भुकेपुढे करायचे काय?’ असा प्रश्न उपस्थित करून या व्यावसायिकांनी निर्बंध झुगारले.
सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत अन्य व्यवसायांसाठी असलेली सूट लक्षात घेऊन या वेळात शहरात सलून दुकाने उघडी होती. अनेकांचा हा पहिला दिवस दुकानांची स्वच्छता आणि साफसफाईतच गेला. शहरातील जवळपास ८० टक्के दुकाने उघडली गेली. मास्क, सॅनिटायझर, हातमोजे असा सुरक्षेच्या साधनांचा वापर करून व्यवसाय करण्यात आला. उर्वरित दुकानेही आज, गुरुवारी उघडली जाणार आहेत. मागील तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली होती. शासनाकडे मदतीची विनंती करूनही कसलीच दखल न घेतल्याने अखेर हे पाऊल उचलण्यात आले. मंगळवारी सायंकाळी संत नगाजी महाराज मठामध्ये सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची सामूहिक बैठक होऊन त्यात हा निर्णय झाला होता.
...
कारवाईनंतरही दुकाने सुरूच ठेवणार
निर्बंध झुगारण्याच्या पहिल्या दिवशी प्रशासनाकडून कुठेही कारवाई झाल्याचे वृत्त नाही. प्रशासनाने कारवाई केली तरी त्यानंतरही दुकाने सुरूच ठेवण्याचा निर्धार समाज संघटनांच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. शासनाने भुकेचा प्रश्न सोडविला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असे संघटनांच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा प्रश्न स्वत:च सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपाध्यक्ष बंडू राऊत, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पूर्व विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, नाभिक एकता मंच संस्थापक-अध्यक्ष धनराज वलुकार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर, कार्याध्यक्ष श्याम चौधरी, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष विशाल वाटकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गणपत चौधरी, नाभिक युवा शक्ती संघटनेचे नेते अमोल तळखंडे आदींनी केले आहे.