काश्मिरातील शहीद नजीर अहमद वानी यांच्या शौर्याला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:40 PM2019-09-16T12:40:28+5:302019-09-16T12:43:21+5:30

भारत सरकारने अशोक चक्र हा सर्वाेच्च पुरस्कार देऊन मरणोपरांत गौरव केलेले नजीर अहमद वानी यांच्या वीरपत्नीचा सन्मान संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन व ब्रिगेडियर संजय नंद यांच्या उपस्थितीत पार पडला.

Salutation to Kashmir's martyr Nazir Ahmad Wani | काश्मिरातील शहीद नजीर अहमद वानी यांच्या शौर्याला सलाम

काश्मिरातील शहीद नजीर अहमद वानी यांच्या शौर्याला सलाम

Next
ठळक मुद्देवीरपत्नी मेहजबीना अख्तर यांचा सन्मानप्रहार संस्थेचे सामाजिक उत्तरदायित्व

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शत्रूंसोबत लढताना वीरगती प्राप्त झालेले लान्स नायक नजीर अहमद वानी यांच्या शौर्याची गाथा रविवारी सायंकाळी नागपुरात पुन्हा निनादली. या वीरपुत्राच्या बलिदानाचा गौरव करण्यासाठी आणि वीरपत्नी मेहजबीना अख्तर यांच्या सन्मानासाठी उपस्थित झालेल्या युवक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या देशभक्तीच्या ओथंबलेल्या भावना महर्षी व्यास सभागृहाने अनुभवल्या.
प्रहार समाज जागृती सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोेजन केले होते. भारत सरकारने अशोक चक्र हा सर्वाेच्च पुरस्कार देऊन मरणोपरांत गौरव केलेले नजीर अहमद वानी यांच्या वीरपत्नीचा सन्मान संस्थेच्या अध्यक्ष शमा देशपांडे यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन व ब्रिगेडियर संजय नंद यांच्या उपस्थितीत पार पडला. सन्मानचिन्ह, ५१ हजार रुपये रोख आणि शाल देऊन त्यांचा सन्मान होत असताना पडणाऱ्या टाळ्या आणि भारतमातेच्या जयजयकाराने वातावरण भारावले होते.
यावेळी लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन म्हणाले, काश्मीरची परिस्थिती आजही चांगली नसताना काश्मीरबाहेर येऊन या वीरपत्नीने देशाला संदेश द्यावा, ही मोठी धाडसी घटना आहे. सैन्यात कोणताही धर्म नसतो, फक्त भारतीय हा एकच धर्म असतो. सैन्यात आलेली माणसे देशप्रेमाने पछाडलेली असतात. देशासाठी एकप्रकारचे पागलपण या सर्वांमध्ये असते. येथे जोश आणि होश दोन्ही असतात. ही नोकरी नसून शौर्यपूर्वक जगण्याचा एक मार्ग असतो. सैन्यात येऊन काय मिळणार, हे विचारणाऱ्यांनी सैन्यात जाऊच नये. लान्स नायक नजीर अहमद वानी यांच्या कामगिरीची माहिती त्यांनी यावेळी दिली. लेफ्टनंट कर्नल सुनील देशपांडे यांच्या आठवणीसह प्रहार संस्थेच्या कार्याचेही त्यांनी मनमोकळे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
ब्रिगेडियर संजय नंद म्हणाले, नागरिकांचे विचार मजबूत आणि शरीर व मन सशक्त असेल तर देश मजबूत होतो. प्रहार संस्थेच्या माध्यमातून चालणारे काम म्हणजे सुनील देशपांडे यांनी देशाच्या मजबुतीसाठी केलेले काम आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी वीरगीतावर नृत्य सादर केले. लान्स नायक नजीर अहमद वानी यांच्या शौर्याची गाथा सांगणारा एक माहितीपटही यावेळी दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन आणि उपस्थितांचे आभार शिवाली देशपांडे यांनी मानले. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाला सैन्यातील अनेक निवृत्त अधिकारी, सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नागरिक, युवक उपस्थित होते. 

पतीने माझा सन्मान वाढविला : वीरपत्नी मेहजबीना अख्तर
सत्काराला उत्तर देताना वीरपत्नी मेहजबीना अख्तर यांचा स्वर कातर झाला होता, तरीही त्यांच्या आवाजात वेगळीच धार होती. त्या म्हणाल्या, पतीचा मला अभिमान आहे. त्यांनी वीरमरण स्वीकारून माझा सन्मान वाढविला. आपला पती बहादूर होता, याचा गर्व वाटतो. घरात बसून किंवा शत्रूच्या कारागृहात मला मरायचे नाही, तर शत्रूसोबत लढताना मरायचे आहे, असे ते नेहमी म्हणत. कुटुंबाला वेळ का देत नाही, यावरून ते सुटीवर आल्यावर आमच्यात भांडणे व्हायची. त्यावर, देशच माझे घर आहे. मला देशाकडे लक्ष द्यायचे आहे, असे ते म्हणत असत. आपला पती देशाचा वीर मुलगा ठरला ही भावना आम्हाला स्फूर्ती देणारी आहे.

Web Title: Salutation to Kashmir's martyr Nazir Ahmad Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.