डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सलाम; खूपच अवघड आहे पीपीई किट घालून उपचार करणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 07:00 AM2020-04-27T07:00:00+5:302020-04-27T07:00:06+5:30
पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट घालून रुग्णांवर उपचार करणे एक आव्हानच आहे. ही किट घालून उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे.
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांच्या उपचारातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफचे कार्य कौतुकास्पद आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रकोपात त्यांचा आत्मविश्वास रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी मदतगार ठरतो आहे. शहरातील ४२ अंश तापमानात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट घालून रुग्णांवर उपचार करणे एक आव्हानच आहे. ही किट घालून उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सला भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. त्यांच्या सात ते आठ तासाच्या ड्युटीत त्या पाणीही पिऊ शकत नाही आणि लघुशंकेलाही जाऊ शकत नाही. घामाच्या धारांनी शरीर भिजून जाते, पण त्यांच्यातील सेवेची ऊर्जा त्यांचा आत्मविश्वास डगमगू देत नाही. आज कोरोनाच्या लढाईतील सेनापती ठरलेल्या डॉक्टर व नर्सला सलाम ठोकावा असेच त्यांचे कार्य आहे.
लोकमतने शहरातील काही डॉक्टरांकडून पीपीई किट घालून काम करताना किती आव्हानात्मक असते, यासंदर्भात चर्चा केली. एप्रिल व मे महिन्यात विदर्भात भीषण गरमी पडते. पारा ४७ पर्यंत जाऊन पोहचतो. सध्या तापमान ४२ ते ४३ डिग्रीदरम्यान आहे. तापमान वाढत असताना कोरोनाचे रुग्णही वाढतच आहे. कोरोनाच्या उपचारात स्वत:ला झोकून दिलेल्या डॉक्टरांना उपचार करताना पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. रुग्णावर उपचार करण्यापेक्षा पीपीई किट घालून काम करणे अधिक अवघड असल्याचा डॉक्टरांचा अनुभव आहे. सरकारने दिलेल्या
दिशानिर्देशानुसार कोरोनाच्या रुग्णावर जिथे उपचार सुरू आहे, तिथे एसी लावण्यास निर्बंध आहे. आयसीयूचे वातावरण सामान्य ठेवण्यात आले आहे. अशात पीपीई किट घालून काम करताना डॉक्टरांना असहाय होत आहे.
असा होतो त्रास
१ ) पीपीई किट घालून ७ ते ८ तास डॉक्टरांना काम करावे लागते. दरम्यान डॉक्टरांना एन-९५ मास्क, ३ प्लायचा सर्जिकल मास्क, ग्लोव्हज व चेहरा झाकण्यासाठी प्लास्टिक कव्हर घालावे लागते.
२) एकदा डॉक्टर वॉर्डमध्ये शिरले की ड्युटी संपेपर्यंत त्यांना बाहेर पडता येत नाही. या ७ ते ८ तासात त्यांना पाणीही पिता येत नाही आणि लघुशंकेलाही जाता येत नाही.
३) किट घातल्यानंतर तापमानापेक्षा जास्त गरमी लागते. सातत्याने घाम येतो. मधुमेह व बीपी आदी समस्येने डॉक्टर ग्रस्त असेल तर जीवही गुदमरल्यासारखा होतो.
४) सातत्याने घाम येत असल्याने शरीरातील पाण्याचा स्तर कमी होतो. खाज सुटते. डोक्यापासून पायापर्यंत डॉक्टर घामाने भिजून जातात. तरीसुद्धा पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावतात.
- श्वास घेताना होतो त्रास
मेयोचे उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले की, संक्रमणापासून बचाव करण्यासाठी पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. हे घातल्यानंतर निश्तिच त्रास होतो. मात्र डॉक्टरांपुढे पहिले आव्हान कोरोनावर विजय मिळविण्याचे आहे. पीपीई किट घातल्याने शरीर घामाने भिजून जाते. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होतात. श्वास घेतानाही त्रास होतो. त्यामुळे उपचार करणे अवघड होते.
- पाणीसुद्धा पिऊ शकत नाही
खासगी रुग्णालयात कार्यरत डॉ. सुशांत चंदावार म्हणाले, ड्युटीवर पीपीई किट घालणे अनिवार्य आहे. हे घालणे व काढण्याचे नियम आहे. संक्रमण टाळण्यासाठी पीपीई किट आवश्यक आहे. किट घातल्यानंतर ६ ते ७ तास जेवण व पाणी शक्य नाही. शिफ्टदरम्यान लघुशंकेला जाणे शक्य नाही. आम्ही तर युवा आहोत, पण जे डॉक्टर वृद्ध आहेत त्यांना होणारा त्रास सांगू शकत नाही. कोरोनाच्या भीतीने एसी बंद ठेवावा लागतो. डोक्याच्या केसापासून बोटाच्या नखापर्यंत वॉटरप्रूफ पीपीई किटने आम्ही घामाघूम होऊन जातो.