जिल्हा प्रशासनाची शहिदांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2016 03:05 AM2016-09-21T03:05:19+5:302016-09-21T03:05:19+5:30
जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके
जिल्हाधिकारी कुर्वे, आ.सोले, कोहळे यांनीही अर्पण केली श्रद्धांजली
नागपूर : जम्मू कश्मीरच्या उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले विकास जनार्दन कुळमेथे व विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके या दोन्ही जवानांना मंगळवारी नागपूर विमानतळावर सैन्यदलासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दोन्ही जवानांचे पार्थिव हवाईमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास या दोन्ही जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले.१९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास विकास कुळमेथे यांचे पार्थिव नागपूर विमानतळावर आणण्यात आले. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह यांनी पार्थिव सन्मानाने राष्ट्रध्वजात ठेवून त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर शहीद विकास कुळमेथे यांचे पार्थिव सैन्यदलाच्या वाहनाने कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंटर येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात ठेवण्यात आले. तर विकास उईके यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी वायुसेनेच्या विमानाने नागपुरात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शासकीय बैठकांच्या निमित्ताने दिल्लीत आहेत. त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या त्यानुसार जिल्हा प्रशासनाततर्फे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी कॅप्टन दीपक लिमये यांनी पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विमानतळावर कर्नल बलबीर सिंह व एअर कमांडर अलोक शर्मा, विंग कमांडर डी. के. पांडे, ग्रुप कमांडर जी. एल. नागेंद्र यांनी शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)
कामठी येथे कुळमेथे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मंगळवारी सकाळी ६.३० वाजता शहीद विकास कुळमेथे यांच्या पार्थिवावर कामठी येथील गार्ड रेजिमेंट सेंन्टर येथे सैन्यदलातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रहार समाज जागृती संस्थांच्या वतीने निवृत्त कर्नल सुनील देशपांडे व फ्लाईंग आॅफिसर श्रीमती शिवाली देशपांडे यांनीदेखील पुष्पचक्र अर्पण केले.
शहिदांना ‘गार्ड आॅफ आॅनर’
नागपूर विमानतळावर सैन्यदलातर्फे शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ देण्यात आले. नायब सुभेदार जय लाल, जवान चंदन राम, अरविंद यादव, महेंद्र सिंह, विनोदकुमार, हनुमान यादव, उगले मुगले विष्णू अर्जुन, डी. श्रीकांत यांनी शहीद जवानांना ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिले. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने अमरावतीकडे नेण्यात आले. विकास कुळमेथे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुरड गावाचे तर विकास उईके यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील नांदगाव हे आहे.