सलाम ‘तिच्या’ प्रसंगावधानतेला! ब्रेन डेड झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या पाच अवयवांचे दान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 10:02 PM2023-05-22T22:02:04+5:302023-05-22T22:14:22+5:30

Nagpur News एकुलत्या एका मुलाचा अपघात होऊन तो ब्रेन डेड झाल्याचे कळल्यावर, त्याचे अवयवदान करण्याचा दिलेला सल्ला मानत एका मातेने आपल्या मुलाच्या पाच अवयवांचे दान केले.

Salute to her resourcefulness! Mother's initiative for organ donation of an only child | सलाम ‘तिच्या’ प्रसंगावधानतेला! ब्रेन डेड झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या पाच अवयवांचे दान 

सलाम ‘तिच्या’ प्रसंगावधानतेला! ब्रेन डेड झालेल्या एकुलत्या एक मुलाच्या पाच अवयवांचे दान 

googlenewsNext

नागपूर : तो आठ वर्षाचा असताना त्याचे वडील गेले. बारावीची परीक्षा दिल्यानंतर आईला घर चालविण्यात मदत व्हावी म्हणून तो ‘केटरर्स’ची कामे करू लागला. परंतु नियतीने घात केला. रस्ता अपघातात डोक्याला जबर मार बसला. त्याचा मेंदू मृत झाला. मातेवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्याही स्थितीत एकुलत्या एक मुलाला ‘अवयव’रुपी जिवंत ठेवण्याचा तिने निर्णय घेतला. या पुढाकाराने पाच रुग्णांना नवे जीवन मिळाले. त्याचे हृदय व फुफ्फुस नागपूरहून विशेष विमानाने चेन्नईला गेले.

खापरखेडा, न्यू बिना भानेगाव येथील हेमाशीष उर्फ आर्यन सुनील बनकर (१८) त्या अवयवदात्याचे नाव. हेमाशिष ८ वर्षाचा असताना त्याचा वडिलांचे निधन झाले. आई रिटा हिने मोठ्या कष्टाने त्याला वाढविले. दहावीत त्याने ९० टक्के गुण घेतले. ‘एनडीए’ सेवेत जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. नुकतीच त्याने बारावीची परीक्षा दिली. निकाल येईपर्यंत आईला आर्थिक मदत व्हावी म्हणून ‘केटरर्स’च्या कामाला जात होता. 

१९ मे रोजी मध्यरात्री हेमाशिष त्याच्या मित्रासोबत दुचाकीवरून घराकडे येत होता. ओम नगर, कोराडी रोडजवळ त्यांची भरधाव दुचाकी अचानक घसरली. हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पहाटे २ वाजता त्याला एलेक्सिस रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. परंतु प्रकृती खालावत गेली. उपचाराच्या तिसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या पथकाने त्याचा मेंदू मृत म्हणजे ‘ब्रेन डेड’ झाल्याचे घोषित केले.

एकुलता एक मुलाला गमविण्याचा दु:ख सहन करण्यापलिकडे होते. रुग्णालयातील डॉ. प्रिती जैन आणि डॉ. मृणाल खोडे यांनी त्याचा आईचे, काका विपीन धाटकर व शिरीष सूर्यवंशी यांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्यासाठी आईने मानवतावादी निर्णय घेतला. हेमाशीषचे हृदय, फु फ्फुस, यकृत, दोन्ही किडन्या व बुबूळ दान करण्यासाठी सहमती दर्शवली. यामुळे पाच रुग्णांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळाली.

-हृदय व फुफ्फुसासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’

‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर’ (झेडटीसीस) नागपूरच्या पुढाकाराने राज्य मार्गदर्शक तत्त्वे आणि ‘नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’द्वारे (नोटो) अवयवाचे वाटप करण्यात आले. त्यानुसार हृद्य व फुफ्फुस चेन्नई येथील ‘एमजीएम हेल्थकेअर’ हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय झाला. यासाठी एलेक्सिस हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोलीस उपआयुक्त (वाहतूक) चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात २० ते ३० पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ केले. १३.७ किलोमीटरचा हा मार्ग केवळ १२ मिनीटात गाठणे शक्य झाले. विशेष विमानाने हे अवयव चेन्नईला पोहचविण्यात आले. येथील दोन महिला रुग्णांना जीवनदान मिळाले.

-या वर्षातील ११वे अवयवदान

उर्वरीत अवयवदानामध्ये एलेक्सिस रुग्णालयामधील २४ वर्षीय युवकाला यकृत, याच रुग्णालयातील ५१ वर्षीय पुरुष रुग्णाला किडनी तर वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ३२ वर्षीय पुरुष रुग्णाला दुसरी किडनी तर माधव नेत्र पेढीला कॉर्निआ दान करण्यात आले.‘ब्रेन डेड’ व्यक्तीकडून आतापर्यंत १०५वे अवयवदान झाले. या वर्षातील हे ११वे दान होते.

Web Title: Salute to her resourcefulness! Mother's initiative for organ donation of an only child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.