समग्र शिक्षा अभियान कार्यालयाची वाट चिखलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:10 AM2021-08-29T04:10:05+5:302021-08-29T04:10:05+5:30
मेट्रोच्या कामाचा अडथळा-साचलेल्या पाण्याचा विळखा नागपूर : शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील जुन्या पटवर्धन हायस्कूल, सीताबर्डी येथील इमारतीत समग्र ...
मेट्रोच्या कामाचा अडथळा-साचलेल्या पाण्याचा विळखा
नागपूर : शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील जुन्या पटवर्धन हायस्कूल, सीताबर्डी येथील इमारतीत समग्र शिक्षा अभियानचे कार्यालय आहे. तसेच या परिसरात शहर व ग्रामीण पाठ्यपुस्तक वितरण केंद्र, प्राथमिक शाळांचे वेतन पथकाचे कार्यालय आहे. या कार्यालयांमध्ये जात असलेल्या वळण रस्त्यावर नागपूर मेट्रो प्राधिकरणाचे पिल्लरचे व सीताबर्डी स्टेशनचे कार्य सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. परिसरातील खोदकामातील मातीच्या ढिगाऱ्यातील माती पावसामुळे रस्त्यावर व परिसरात पसरून चिखल व पावसाच्या पाण्याचे तळे रस्त्यावर निर्माण झाले आहे. इमारत परिसराला गवत व साचलेल्या पाण्याचा विळखा पडलेला आहे. ज्यामुळे परिसरात दुर्गंध, चिखलाचे साम्राज्य नजरेस पडत आहे. कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या शालेय कर्मचाऱ्यांना चिखलात पडण्यापासून वाचत कार्यालयीन इमारत गाठावी लागत आहे. मनसेच्या जनहित कक्ष व शिक्षक शिक्षकेत्तर सेनेने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी तसेच इमारत परिसरात साचलेले पाणी व गवताची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी केली आहे.