बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडवणारी समानता एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 09:54 AM2019-01-14T09:54:50+5:302019-01-14T09:55:49+5:30
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दीक्षाभूमीवरून सुरू होऊन देशातील सर्व प्रमुख बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणारी समानता एक्स्प्रेस नावाची भारत दर्शन रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष रेल्वेगाडी १४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता नागपूरवरून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे वेस्ट झोनचे समूह महाव्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अरविंद मालखेडे म्हणाले, १० दिवसांच्या टुर पॅकेजमध्ये प्रवाशांना नागपूर येथील दीक्षाभूमीशिवाय मुंबईतील चैत्यभूमी, इंदूरजवळील महु, गया येथील बोधगया, वाराणशीत सारनाथ नौतनवात लुंबिनी, गोरखपूरमध्ये कुशीनगर आदी स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. समानता एक्स्प्रेसमध्ये नागपूरशिवाय वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथील प्रवासी प्रवास करू शकतील. २४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या समानता एक्स्प्रेसमध्ये (स्टँडर्ड क्लास) स्लिपर क्लाससाठी प्रति प्रवासी १०,३९५ रुपये आणि थर्ड एसी (कम्फर्ट क्लास) साठी १२,७०५ रुपये प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.
प्रवाशांना मिळेल सुविधा
बौद्ध धर्माच्या स्थळांचे दर्शन घडविणाऱ्या समानता एक्स्प्रेसमध्ये आयआरसीटीसीच्या वतीने प्रवाशांना खाद्यपदार्थांपासून स्थळांवर नेण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी १० दिवस भोजनाच्या व्यवस्थेशिवाय धर्मशाळा, लॉज आदी ठिकाणी थांबण्याची चांगली सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. प्रवासात प्रवाशांना शाकाहारी भोजन देण्यात येणार आहे. समानता एक्स्प्रेससाठी आरक्षण सुरू झाले आहे. १६ कोचच्या या गाडीत १२ स्लिपर, १ एसी थ्री टायर आणि ३ जनरल कोच राहतील. प्रवासात १०० कर्मचारी प्रवाशांच्या सेवेसाठी हजर राहतील. मालखेडे यांनी सांगितले की, आगामी काळात यासारख्या आणखी प्रवासी रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. पत्रकार परिषदेला आयआरसीटीसीचे रविकांत जंगले, अहद सिद्दीकी उपस्थित होते.