समता मार्चने आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:03 PM2019-03-08T22:03:16+5:302019-03-08T22:06:29+5:30
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ आणि संबुद्ध महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० मार्चला दीक्षाभूमी येथील सभागृहात दोन दिवसीय दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी महिलासाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी संविधान चौक ते दीक्षाभूमी समता मार्च काढून या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. शनिवारी या संमेलनाचे उद्घाटन केले जाणार आहे.
‘आयदान’कार लेखिका ऊर्मिला पवार या संमेलनाच्या अध्यक्ष असून सार्कच्या पदाधिकारी नूर जहीर या उद््घाटक म्हणून लाभल्या आहेत. कुसुमताई तामगाडगे या स्वागताध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून घडलेल्या स्त्री लेखिकांच्या, कवयित्रींच्या, नाट्यलेखिकांच्या चिंतनाला नवा उजाळा आणि नवसाहित्यिकांना दिशा देण्याचे काम या संमेलनातून होणार आहे. जपानच्या डॉ. मिकी इनोकी, अमेरिकेच्या डॉ. वृंदा साखरकर, कर्नाटकच्या बामा याही या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. शनिवारी संविधान चौक येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर पल्लवी वाहाने यांच्या नेतृत्वातील ग्रुपने ‘संविधानाची जाणीव’ हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर समता मार्चला सुरुवात करण्यात आली. ऊर्मिला पवार व नूर जहीर यांच्यासह पश्चिम बंगालच्या कल्याणी ठाकूर, झारखंडच्या प्रसिद्ध कवयित्री निर्मला पुतुल, दिल्लीच्या डॉ. रजनी दिसोडिया, हेमलता, महामंडळाचे प्रा. सतेश्वर मोरे, राज्याच्या विविध भागातून आलेल्या लेखिका, कवयित्री व समीक्षक मार्चमध्ये सहभागी होत्या. महाराजबाग ते रामदासपेठ या मार्गाने होत हा समता मार्च दीक्षाभूमीवर पोहचला. येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देत समता मार्चचा समारोप झाला. आयोजनातील संबुद्ध महिला संघाच्या छायाताई खोब्रागडे, जलदा ढोके, हंसा नारनवरे, विशाखा कांबळे, सुगंधा खांडेकर, सुरेखा लोकरे, सुषमा कळमकर, पुष्पा घोडके आदी पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
शनिवारी दीक्षाभूमीच्या सभागृहात सकाळी १० वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, विधान चर्चा व काव्यसंमेलन अशा विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन होईल.