समता प्रतिष्ठान आत्मनिर्भर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:28 AM2020-11-22T09:28:26+5:302020-11-22T09:28:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे महत्त्व कुठेही कमी होणार नाही, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे महत्त्व कुठेही कमी होणार नाही, उलट हे प्रतिष्ठान आणखी मजबूत, सक्षम व आत्मनिर्भर करण्यात येणार आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे स्पष्ट केले.
सामाजिक न्याय विभागातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. या दरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. निधी नसल्याच्या कारणावरून समता प्रतिष्ठान बंद करण्यात येत असल्याची तसेच बार्टीचे महत्त्व कमी होणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी ही बाब स्पष्टपणे खोडून काढली. नारनवरे म्हणाले, बंद करण्याचा प्रश्नच येत नााही. उलट समता प्रतिष्ठानच्या सक्षमीकरणासाठी आम्ही काम करीत आहोत. यासाठी आम्ही एक आराखडाही तयार केला आहे. प्रतिष्ठानला शासकीय निधीची गरजच पडून नये, यासाठी विविध उत्पन्नाच्या साधनांचा विचार केला जात आहे. सीएसआर, केंद्र सरकारकडून येणारा निधी. तसेच विविध प्रशिक्षणातून उत्पन्न कसे निर्माण करता येईल, यावर भर दिला जात आहे. उत्पन्नाचे वितरण कसे होणार यावरही काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.
बॉक्स
निधी लवकरच मंजूर होणार
समाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत समता प्रतिष्ठानच्या निधीबाबत निर्णय घेण्यात येणार असून लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचे नारनवरे यांनी सांगितले.