.. अन् गडकरींनी सांगितली सांबारवडीची रेसिपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:51 AM2020-01-10T10:51:11+5:302020-01-10T10:52:56+5:30
महानगरपालिकेच्या वतीने ऑरेंज सिटी फूड प्लाझाचे अर्थात ‘खाऊ गल्ली’चे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गांधीसागरची कालची चौपाटी अर्थात आजची ‘खाऊ गल्ली’ गुरुवारी सायंकाळी खमंग पदार्थांच्या सुगंधाने दरवळून निघाली. या चौपाटीवर वाढलेली नागपूरकर खवय्याची तसेच सायंकाळी फिरायला आलेल्यांची गर्दी आणि ऑर्के स्ट्राच्या संगीताने ही संध्याकाळ अधिकच मोहक झाली. निमित्त होते, या खाऊ गल्लीच्या लोकर्पणाचे!
महानगरपालिकेच्या वतीने ऑरेंज सिटी फूड प्लाझाचे अर्थात ‘खाऊ गल्ली’चे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर संदीप जोशी, आमदार विकास कुंभारे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमहापौर मनिषा कोठे, सत्ताधारी पक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर नंदा जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, गांधीसागर तलावावरील खाऊ गल्लीची संकल्पना अत्यंत चांगली असून, यापुढे येथील स्वच्छता राखण्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. येथील स्टॉल चांगले करा, सुरक्षेच्या दृष्टीने गार्ड ठेवा, एकच गॅस कनेक्शन व त्यावर वापरकर्त्याचे मीटर राहील, अशी व्यवस्था निर्माण करा, हवे तर आपण सहकार्य करू. स्वच्छ मिनरल पाण्याचीही व्यवस्था ठेवा, गरज भासल्यास खासदार निधीतून सहकार्य करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली. महापौर संदीप जोशी म्हणाले, येथील ३२ स्टॉलसाठी ७८ अर्ज आले होते. पुन्हा नव्याने आठ स्टॉल्स वाढणार असून ईश्वरचिठ्ठीने हे वाटप झाले आहेत. खाऊ गल्लीमध्ये सांडपाणी, सुरक्षा व्यवस्था केली जाणार आहे.
हा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षात असून सुरक्षा गार्डही राहणार आहे. मात्र पोलीस आयुक्तांनी येथील सुरक्षेसाठी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी याप्रसंगी केली. संचालन बंडू राऊत यांनी केले.
गडकरी हे उत्तम कूक
अस्सल खवय्या म्हणून ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खवय्येगिरीसह त्यांच्यातील एक कूकही यावेळी पाहायला मिळाला. गुरुवारी गांधीसागर तलावालगत असलेल्या ‘खाऊगल्ली’च्या लोकार्पणासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एन्ट्रीच झाली ती स्टॉल्स समोरून. त्यांनी एकेका स्टॉल्सची माहिती घेत मंचाकडे कूच केले. मध्येच एका स्टॉलवर सांबारवडी पाहून त्यांनी ती खायला घेतली. सांबारवडी खातानाच त्यांना पुण्याच्या सांबारवडीची आठवण झाली, मग काय, गडकरींनी स्टालधारकाला पुणेरी पद्धतीने सांबारवडी कशी तयार करायची याची रेसिपीच सांगितली. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांबारवडीची रेसिपी सांगताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. गडकरी हे उत्तम कूकही असल्याची प्रचिती यावेळी सर्वांना आली.