नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांममधील विद्यार्थ्यांचा गणवेश एकसमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:46 PM2020-08-18T22:46:13+5:302020-08-18T22:48:33+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने यंदाच्या सत्रापासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा गणवेश एकसारखा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र ओळख दिसून यावी, या उद्देशाने यंदाच्या सत्रापासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा गणवेश एकसारखा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण समितीच्या बैठकीत गणवेशाचा रंग निश्चित करण्यात आला. यात विद्यार्थ्यांना मरुन रंगाचा पॅण्ट, पांढरा गुलाबी रंगाचा शर्ट राहणार आहे तर विद्यार्थिनीकरिता पांढरा गुलाबी रंगाची कुर्ती व मरुन रंगाचा पायजमा राहणार आहे. विशेष म्हणजे यंदा नववी व दहावीच्या जि.प.च्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाणार आहे.
पूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाकी आणि पांढरा तर विद्यार्थिनीसाठी निळा व पांढऱ्या रंगाचा गणवेश होता. दरम्यान ठिकठिकाणी खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झाल्याने, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे रंगीत गणवेश पालकांना आकर्षित करू लागले. सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेशासाठी शाळांना थेट निधी देण्यात येत होता. गणवेशाचा अधिकार शाळेतील व्यवस्थापन समितीला देण्यात आला. त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती आपल्या स्तरावर वेगवेगळ्या रंगाचे गणवेश खरेदी क रीत होती. पण यंदा शिक्षण सभापती भारती पाटील यांनी एकच ड्रेसकोड ठेवण्याची संकल्पना मांडली, त्याला सर्व सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
समितीने आता गणवेशाच्या रंगावर शिक्कामोर्तब केले आहे. गणवेशावर जिल्हा परिषदेचा लोगो राहणार आहे. शालेय व्यवस्थापन समितीला गणवेश खरेदी करण्याचे अधिकार दिले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण होणार असल्याचे शिक्षण सभापती भारती पाटील यांनी सांगितले.