समीर जोशी जामिनासाठी हायकोर्टात
By admin | Published: December 22, 2015 04:44 AM2015-12-22T04:44:18+5:302015-12-22T04:44:18+5:30
शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने नागपूर येथील प्रकरणात जामीन
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांच्या घामाचा पैसा हडपणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशीने नागपूर येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सोमवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर शासनाला नोटीस बजावून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
यापूर्वी समीरने अमरावती व अकोला येथील प्रकरणात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज खारीज करण्यात आला होता. याप्रकरणात समीर व त्याची पत्नी पल्लवी मुख्य आरोपी आहेत. उच्च न्यायालयाने पल्लवीला जामीन दिला आहे. सध्या ती बाहेर असून समीर कारागृहात आहे.
समीरने २००३ मध्ये गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याने अनेक कंपन्या नुकसानीत सुरू असतानाही फायद्याचे प्रलोभन दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांनी फसविले.
समीर व पल्लवी यांच्याविरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४२०, ३४ व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीरला १५ आॅक्टोबर २०१३, तर पल्लवीला २९ आॅक्टोबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. जोशी दाम्पत्य चर्चासत्र व एजंटस् माध्यमातून योजनांचा प्रचार करीत होते. समीरतर्फे अॅड. आदिल मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)