SSC Result 2020; नागपुरातील समीक्षा पराते ठरली 'टॉपर'; ९९.४०% गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 03:34 PM2020-07-29T15:34:36+5:302020-07-29T15:40:45+5:30
दहावी स्टेट बोर्डाच्या परीक्षेत ९९.४०% गुण मिळवत नागपूरातील समीक्षा पराते ही मुलगी 'टॉपर' ठरली आहे. विशेष म्हणजे तिने संस्कृत, गणित आणि समाजशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावी स्टेट बोर्डाच्या परीक्षेत ९९.४०% गुण मिळवत नागपूरातील समीक्षा पराते ही मुलगी 'टॉपर' ठरली आहे. विशेष म्हणजे तिने संस्कृत, गणित आणि समाजशास्त्र या विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केले.
समीक्षा ही रमणा मारोती परिसरात असलेल्या जे.पी. इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील समीक्षाने कुठलीही ट्युशन न लावता हे यश मिळवले. वर्तमानात बहुतांश पालक आपल्या मुलांना शाळेव्यतिरिक्त एक्स्ट्रा शिकवण्या लावतात, तेथे समीक्षाचे हे यश वाखाणण्याजोगे आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. समीक्षाचे वडील हे सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले आहेत तर आई रेणुका गृहिणी आहे. घरात आई, वडील यांच्यासह मोठा भाऊ आणि आजी आहे. समीक्षा ला विज्ञानात गोडी असून भविष्यात तिला अभियंता बनण्याची इच्छा आहे आणि सोबतच समाजकार्यात सहभागी होऊन, महिलांच्या समस्या सोडवायच्या आहेत. तिला नृत्य, गायन यातही विशेष रुची आहे.