रेल्वेत समोसा, सँडविच महाग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 09:00 AM2023-03-10T09:00:00+5:302023-03-10T09:00:01+5:30
Nagpur News रेल्वेतील जेवणच नव्हे तर समोसा, सँडविचही चांगलेच भाव खात असल्याने हे खरेदी करून खाणे या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.
नागपूर : भारतीय नागरिकांची जीवनवाहिनी म्हणून रेल्वेला मान दिला जातो. परवडणाऱ्या दराचे तिकीट घेऊन या गावावरून त्या गावी ती घेऊन जात असल्याने सर्वाधिक गोरगरीब रेल्वेत प्रवास करतात. ही मंडळी कष्टकरी असते. एका राज्यातून कामाच्या शोधात ती दुसऱ्या राज्यात जाते. त्यांच्याकडे खाण्यापिण्याचेही काही साधन नसते. रेल्वेतील महागडे जेवण घेऊ शकत नसल्याने ते रेल्वेत समोसा, सँडविच घेऊन आपले आणि मुलांचे पोट भरण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेल्वेतील जेवणच नव्हे तर समोसा, सँडविचही चांगलेच भाव खात असल्याने हे खरेदी करून खाणे या गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिणामी पोटाची आग पोटात मारून त्यांना प्रवास करावा लागत असल्याची स्थिती आहे.
विशेष म्हणजे, रेल्वे बोर्डाने रेल्वे स्थानकावर विकले जाणारे समोसे, डोसा, ब्रेड पकोडा, अंडा बिर्यानी, तसेच थालीचे दर निर्धारित करण्याचे अधिकार झोनल रेल्वेला सोपविले आहेत. मध्य रेल्वेच्या झोनल ऑफिसने रेल्वेत विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांची किंमत १० जुलैपासून वाढवली आहे. त्यामुळे सर्वच प्रकारचे खाद्य पदार्थ महाग झाले आहेत.
खाद्य पदार्थ आधीचे दर आताचे दर
समोसा आधी ३० रुपये आता चाळीस रुपये प्लेट
डोसा आधी २० ते २५ रुपये आता ५० रुपये
पनीर पकोडा आधी ३० आता ५० रुपये
वेज बर्गर आधी २८ रुपये आता ४० रुपये
ईडली आधी ३० रुपये आता ४० रुपये
---- प्रवासी संघटना पदाधिकारी म्हणतात...
रेल्वेत सर्वच श्रेणीतील प्रवासी प्रवास करतात. त्यात अनेक जण गरीब असतात. मुलाबाळांसह ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी (कामाच्या शोधात) जातात. आधीच त्यांची स्थिती बिकट असते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने या बिचाऱ्यांचा विचार करून खाण्यापिण्याच्या पदार्थांचे भाव वाढवू नये, असे मत भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी मांडले आहे.
प्रवासी म्हणतात...
तीव्र आर्थिक कोंडीमुळे पोट भरण्याची गावात सोय नसल्याने आम्ही आपले गाव, घरदार आणि नातेवाईक सोडून दूर कुठेतरी जातो. तेथे जाण्यासाठी तिकिटाचे पैसे जमावे म्हणून असले नसले विकून टाकतो. प्रवासात मोठी माणसं कशीबशी भुकेची आग सहन करतात. मात्र, लहान मुलांचे काय. सरकारने, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खाद्य पदार्थांचे भाव वाढविताना किमान एवढा तरी विचार करावा, अशा मार्मिक प्रतिक्रिया भिलाई येथील सोनू अदामी आणि कोलकाता येथील किरपाल बनीक यांच्यासह विविध प्रवाशांनी दिल्या.
..तर कारवाई करू
झोनल ऑफिसच्या आदेशानुसार खाद्यपदार्थांचे दर १० जुलै २०२१ ला वाढविण्यात आले आहे. त्यानंतर कसलीही दरवाढ झाली नाही. मात्र, त्या दरांपेक्षा जास्त पैसे घेऊन खाद्यपदार्थ विकत असल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करू !
कृष्णनाथ पाटील, सिनिअर डीसीएम, सेंट्रल रेल्वे, नागपूर