समोसे, चहाचा ‘एक्स-रे’
By Admin | Published: January 8, 2016 03:43 AM2016-01-08T03:43:24+5:302016-01-08T03:43:24+5:30
एक्स-रे फिल्मवर प्रक्रिया करणाऱ्या ‘डार्क रुम’मध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ तयार केले जात आहे,
‘डार्क रुम’ चे झाले किचन : सुपर स्पेशालिटीतील अजब प्रकार
सुमेध वाघमारे नागपूर
एक्स-रे फिल्मवर प्रक्रिया करणाऱ्या ‘डार्क रुम’मध्ये चहा, नाश्त्याचे पदार्थ तयार केले जात आहे, तर लाखो रुपये किमतीच्या एक्स-रे मशीनच्या सानिध्यात चहा-समोस्यांचा आस्वाद घेतला जात आहे. जागोजागी खाद्यपदार्थांचे सामान आणि निघालेल्या कचऱ्याचा ढीग पडून दुर्गंधी सुटली आहे. हा प्रकार, ग्रामीण भागातील रुग्णालयातील नव्हे तर उपराजधानीतील चक्क सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आहे. धक्कादायक म्हणजे, या कॅन्टीनमधून रुग्णालय प्रशासनाला एक रुपयाही मिळत नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) हृदय शल्यचिकित्सा, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी या सात विभागातून रुग्णसेवा दिली जाते. गेल्या पाच वर्षात बाह्यरुग्ण विभागासोबतच आंतररुग्णांतही वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ५ हजार ५१२ रुग्ण भरती होते. गेल्या वर्षी १ हजार ५५१ रुग्णांची वाढ होऊन ही संख्या ७ हजार ६३ वर गेली आहे. रुग्णालयात रोज पंधरावर एन्जीओग्राफी, पाचवर एन्जीओप्लॅस्टी, दोन हृदयशल्यक्रियासह दोन न्युरो सर्जरी होतात. या शिवाय सर्वच वॉर्डाच्या खाटा गंभीर रुग्णाने फुल्ल असतात. रुग्णालयात विदर्भासह छत्तीसगड, मध्य प्रदेशातून रुग्ण येतात. येथील रुग्णसेवा अद्यावत करण्यासाठी रुग्णालय प्रशासन नवनवीन उपाययोजना करीत असल्याचेही चित्र आहे.
असे असताना रुग्णालयाच्या आतील कॅन्टीनकडे अद्यापही कोणाचेच लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘कंडम’ची मंजुरी न मिळताच कॅन्टीन झाले सुरू
सुपर स्पेशालिटीच्या क्ष-किरण विभागात १९९६ मध्ये पहिल्यांदा एक्स-रे मशीन लागली. २०१३ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून या विभागाला नवीन एक्स-रे मशीन मिळाली. शासकीय नियामानुसार कालबाह्य झालेली मशीन कंडम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्याप्रमाणे संबंधित विभागाने एक्स-रे मशीन कंडम करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळालेली नाही. मात्र, मेडिकल प्रशासनाने मंजुरीची प्रतीक्षा न करताच ही जागा कॅन्टीन मालकाला दिली.
कॅन्टीनचा त्रास असूनही तक्रार नाही
विविध आजाराने कण्हत असलेल्या रुग्णांच्या गर्दीच्या ठिकाणीच या चहा-नाश्त्याचे कॅन्टीन आहे. या कॅन्टीनला मेडिकल प्रशासनाने मंजुरी दिली असलीतरी कॅन्टीन मालक कुठलेच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. एक्स-रे विभागाच्या समोर असलेल्या या कॅन्टीनने नोंदणी कक्षाचीही बरीच जागा बळकावली आहे. याचा त्रास रुग्णांसह डॉक्टरांनाही होत आहे. मात्र, या विरोधात कोणीच तक्रार किंवा बोलत नसल्याचे चित्र आहे.
जागा, पाणी, वीज सर्वच मोफत
‘इंडियन टी हाऊस’ नावाने असलेल्या या कॅन्टीनवर रुग्णालय प्रशासन चांगलेच मेहरबान असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, नियमानुसार शासकीय जागेचा वापर करण्यासाठी निविदा व इतर प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतु येथे ही प्रक्रिया तर दूरच कॅन्टीनला जागा, पाणी आणि वीजही मोफत दिली जात असल्याची माहिती आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.