जिल्ह्यातील ८१ गावांचे नमुने दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:08 AM2021-08-15T04:08:34+5:302021-08-15T04:08:34+5:30
नागपूर : नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या जिल्ह्यातील १०६६ गावांतील पाण्याच्या नमुन्यांपैकी ८१ नमुने प्रदूषित आढळून ...
नागपूर : नागपूर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून जुलै महिन्यात तपासण्यात आलेल्या जिल्ह्यातील १०६६ गावांतील पाण्याच्या नमुन्यांपैकी ८१ नमुने प्रदूषित आढळून आले आहेत. मागील तपासणीच्या तुलनेत यंदा प्रदूषित प्रमाण वाढले आहे. रामटेक, भिवापूर परिसरातील पाणी सर्वाधिक दूषित असल्याचेही समोर आले आहे.
पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ग्रामीण भागात अजूनही प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे वास्तव सातत्याने समोर येते. प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून येणाऱ्या पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. दर महिन्याला होणाऱ्या या तपासणीच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेचा अंदाज घेतला जातो. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतीला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्रामीण पातळीवरील कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. जुलै महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १०६६ जलनमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले. त्यापैकी ८१ नमुने दूषित आढळून आले. रामटेक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतल्या गेलेल्या ७४ नमुन्यांपैकी १२ अर्थात १६ टक्के, तसेच भिवापुरातील १२९ नमुन्यांपैकी २० अर्थात १६ टक्के नमुने दूषित आढळून आलेत. त्याखालोखाल देवलापार येथील १३, तर कळमेश्वमधील ११ टक्के नमुने दूषित आढळून आले.
- कुहीतील एकही पाणी नमुना दूषित नाही
कुही भागातील पाणी पिण्यायोग्य असून, तेथील एकही नमुना दूषित नव्हता. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक झाली. यावेळी प्रदूषित पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.