एफडीएने घेतले ‘त्या’ इंजेक्शनचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:51+5:302021-06-29T04:07:51+5:30
नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अॅम्पोटेरीसीन बी’चा ‘लिपीड कॉम्प्लेक्स’ या इंजेक्शनमुळे मेडिकल, मेयोमधील रुग्णांना ‘रिअॅक्शन’ आल्याचे वृत्त ...
नागपूर : म्युकरमायकोसिसवर (काळी बुरशी) प्रभावी असलेले ‘अॅम्पोटेरीसीन बी’चा ‘लिपीड कॉम्प्लेक्स’ या इंजेक्शनमुळे मेडिकल, मेयोमधील रुग्णांना ‘रिअॅक्शन’ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने सोमवारी मेडिकलला भेट देत बंदी आणण्यात आलेल्या इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले. एकट्या मेडिकलमध्ये संबंधित बॅचचे २,५०० वर इंजेक्शन असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, १९ जून रोजी ‘आय ०२१००५’ या बॅच क्रमांकाचे ‘अॅम्पोटेरीसीन बी लिपीड कॉम्प्लेक्स’ इंजेक्शनचा जवळपास दीड हजारांवर साठा आरोग्य विभागाकडून मेडिकलला उपलब्ध झाला. म्युकरमायकोसिसच्या सुमारे ७७ रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात आले. काही वेळानंतर बहुसंख्य रुग्णांना थंडी वाजून ताप व मळमळ वाटायला लागले. अकोला मेडिकलमध्येही याच बॅचच्या इंजेक्शनमुळे रुग्णांमध्येही हीच लक्षणे दिसून आल्याने त्यांनी २५ जून रोजी या इंजेक्शनचा वापरावर बंदी आणली. यामुळे मेडिकल प्रशासनानेही संबंधित बॅचचे इंजेक्शन न वापरण्याचा सूचना केल्या. २५ जून रोजी याच इंजेक्शनचा ‘बॅच क्र. एलबीडी १४८’च्या इंजेक्शनमधूनही रुग्णांना लक्षणे दिसून आली. यामुळे २६ जून रोजी मेडिकल प्रशासनानेही यावर बंदी आणली. याच बॅचचे इंजेक्शन औरंगाबाद मेडिकलमध्ये असल्याने त्यांनीही न वापरण्याचा सूचना दिल्या. ‘लोकमत’ने हे वृत्त सोमवारी प्रकाशित करताच, ‘एफडीए’ने मेडिकलला भेट दिली. एफडीएचे सहायक आयुक्त (औषधी) पुष्पहास बल्लाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले, दोष आढळून आलेल्या बॅचमधील इंजेक्शनचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.