समृद्धी महामार्ग जगातील सर्वोत्कृष्ट मार्ग असेल : मुख्यमंत्री फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 08:25 PM2018-11-23T20:25:52+5:302018-11-23T20:51:28+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोडस्च्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोडस्च्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आयोजनाखाली इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भौतिक आणि व्हर्च्युअल गोष्टींना जोडून भविष्यात रस्ते व पुलांची निर्मिती शक्य आहे. मात्र, स्मार्ट, सस्टेनेबल आणि सेफ हा त्या पुलांचा निर्मितीचा आधार असावा. आपण तंत्रज्ञानाचा जेवढा वापर करू तेवढे उत्कृष्टतेचे निकष पूर्ण करू शकू. प्रकल्पांचा डीपीआर तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपण खऱ्या अर्थाने अचूक डीपीआर तयार करता येईल. त्यामुळे डीपीआर निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याचा आग्रहही त्यांनी केला. तसेच या अधिवेशनात ज्या १५ कोडचे विमोचन झाले, त्या सर्वांचा एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म तयार करून डीपीआर निर्मितीमध्ये या कोडचा व नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश व्हावा. तसेच आधुनिक, अद्ययावत, शाश्वत, स्वयंपूर्ण व सुरक्षित रस्ते बांधणीवर भर देण्याचे आव्हान बांधकाम क्षेत्रातील अभियंत्यांनी स्वीकारावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
रस्ते हे संस्कृतींना जोडणारे समृद्धी व विकासाचे पथ
जगभरात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. अशावेळी रस्त्यांचे आणि पुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चंद्रगुप्त मौर्याने त्या काळी तक्षशिला ते पाटलीपुत्र असा रस्ता बांधला होता. त्याला समृद्धीचा रस्ता म्हटल्या जात असे. अगदी त्याचप्रमाणे दुसºया शतकातही रेशीम मार्गावरून (सिल्क रूट) व्यापार होत असे. इतकेच नव्हे तर चीनमधील मंगोलियाजवळील परिसरात अजंठा एलोरा लेणींच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. तेथील व्यापाऱ्यांनी त्या अजंठातून पाहून त्या तेथे साकारल्या आहेत. हे सर्व बघताना कळते की रस्ता हे संस्कृती आणि सभ्यता जोडणारे विकासाचे पथ आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रस्ते सुरक्षेसंंबंधी संवेदनशीलता हवी : नितीन गडकरी
भारतात रस्ते अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. शिवाय तीन लाख लोकांना रस्ते अपघातात अपंगत्व येते. याचा दोष केवळ नशिबाला देता कामा नये. कारण अनेक घटना या रस्ते अभियांत्रिकीमधील चुकांमुळे होतात. चुकीचा डीपीआरही याला जबाबदार आहे. त्या अनुषंगाने रस्ते निर्मिती व बांधणीतील सर्व संबंधित विभागांनी संवेदनशील असावे. या संवेदशीलतेमुळे अनेक जीव वाचवता येतील, असे मत केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
ज्ञानाचे समृद्धीत रूपांतरण हेच भविष्य असून आमच्या सरकारने पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले आहे. विज्ञान, संशोधन, व्यासायिकता, कौशल्ये या गोष्टींवर भर देण्याचा सल्लाही यावेळी गडकरी यांनी दिला. सोबतच पायाभूत सुविधांचा खर्च कमी करण्यावर भर देताना गुणवत्ताही कायम ठेवणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
रेल्वेसह विविध विभागांच्या स्वत:च्या संशोधन संस्था व विद्यापीठ आहे. इंडियन रोड काँग्रेस(आयआरसीने)सुद्धा या धर्तीवर स्वत:ची एक संशोधन संस्था किंवा विद्यापीठ उभारावे, त्याला राज्य व केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग २२ हजार किमीवर पोहोचले : चंद्रकांत पाटील
पूर्वीच्या सरकारमध्ये अर्थसंकल्पात १७०० कोटींचे बजेट होते. आमच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ते सहा हजार कोटींवर पोहचवले आहे. तसेच केंद्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या साहाय्याने तब्बल एक लाख सहा हजार कोटी रुपये रस्ते विकासार्थ मिळाले असून गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ५ हजारांवरून २२ हजार किलोमीटरवर पोहचली, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
रस्ते सुरक्षितता यावर तडजोड नाही : के. एस. कृष्णा रेड्डी
‘आयआरसी’चे अध्यक्ष के. एस. कृष्णा रेड्डी म्हणाले, रस्तेबांधणी व रस्ते विकासाच्या क्षेत्रात ‘आयआरसी’चे योगदान मोलाचे असून शाश्वत विकासावर आधारित रस्ते बांधणीसाठी ‘आयआरसी’ प्रयत्नशील असते. रस्ते बांधणीच्या क्षेत्रातील संशोधनावर ‘आयआरसी’ विशेष भर देत असून देशातील महामार्ग बांधणीत लक्षणीय सुधारणा होत आहे. पर्यावरणपूरक रस्ते बांधणीद्वारे रस्त्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्यात येत आहे. रस्ते विकासाच्या क्षेत्रात मोठे प्रकल्प सध्या देशात उभारले जात आहेत. रस्ते विकासाच्या संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. रस्ते बांधणीबरोबरच रस्ते सुरक्षिततेचाही ‘आयआरसी’ साकल्याने विचार करत असून यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. रस्ते सुरक्षितता या मुद्याबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
अभियंते हे राष्ट्रनिर्माते : युद्धवीर सिंह मलिक
सचिव युद्धवीर सिंह मलिक म्हणाले, रस्ते विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान वेगात बदलत असून नवनवीन संशोधन पुढे येत आहे. हे संशोधन प्रत्यक्ष कामांमध्ये उतरविण्याची गरज असून या दृष्टीनेही ‘आयआरसी’ नक्कीच प्रयत्न करेल. अभियंते हे राष्ट्रनिर्माते असून नवे संशोधन व नवी कामे करण्याची संधी अभियंत्यांना मिळाली पाहिजे. रस्ते अपघातांची संख्या कमी करून रस्ते सुरक्षितता या विषयालाही प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मलिक यांनी सांगितले.
मानकापूर स्टेडियममध्ये आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवन्ना, गोवा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुधीर ढवळीकर, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे , विशेष सचिव बी.एन. सिंह, सचिव (कार्य) अजीत सगणे, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजित बांगर, अधिवेशनच्या स्थानिक आयोजन समितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता आणि स्थानिक आयोजन समितीचे सचिव रमेश होतवानी उपस्थित होते.
प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) चंद्रशेखर जोशी यांनी केले. आयआरसीचे अध्यक्ष के. एस. कृष्णा रेड्डी यांनी स्वागतपर भाषण केले. निर्मलकुमार यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयआरसीच्या १५ ‘कोड’च्या पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाच्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. सोबतच आयआरसीच्या नवीन १५ कोडच्या पुस्तकाचे विमोचनही यावेळी करण्यात आले.
अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमच्या नुतनीकरण कामाचे उद्घाटन
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल हे खेळाडूंकरिता प्रशिक्षणाचे महत्त्वाचे दालन आहे. प्रशिक्षणासोबतच येथे विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येते. आयआरसीच्या अधिवेशनानिमित्त तंत्रज्ञानयुक्त अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमचे नुतनीकरण करण्यात आले. याचे उद्घाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पांडे- नारायण यांना जीवनगौरव
बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. माजी डायरेक्टर जनरल ए.डी नारायण आणि आयआयटी खडगपूरचे प्रा. डॉ. बी.बी पांडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच डॉ. मधू एरमपल्ली यांना नेहरू अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. व्ही.जी. हवंगी, ए.के. सिन्हा, सतीश वट्टे, यांना बेस्ट पेपर, डॉ. एम. किशोर कुमार, एस.के. श्रीवास्तव यांना महाराष्ट्र पीडब्ल्यूडी मेडल, तर अभिषेक आणि प्रे. धरमवीर सिंग यंना बिहार पीडब्ल्यूडी मेडलने सन्मानित करण्यात आले.