हा महामार्ग विदर्भ, मराठवाडासह महाराष्ट्राच्या विकासात 'समृद्धी' आणेल - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 02:24 PM2022-12-03T14:24:51+5:302022-12-03T14:30:06+5:30
आज नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात दाखल झाले असून कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांनी व्यवस्थेचा आढावा व पाहणी केली.
बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पाहणी केली. तत्पूर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
फडणवीस म्हणाले, ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. नागपूर-शिर्डी हा ५०० किमी मार्ग पूर्ण झाला असून त्याच लोकार्पण होतयं. उर्वरित मार्गाचं कामही सहा महिन्यांत पूर्ण होईल. यातून आपण एक नवीन इकोनॉमिक डोअर तयार करत आहोत, १४ जिल्हे इंटेग्रेड करण्याचं आणि पोर्टशी जोडण्याचं काम या माध्यमातून होतयं, असे फडणवीस यांनी सांगितले. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडासह महाराष्ट्राच्या विकासात समृद्धी आणेल, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नांवर त्यांनी बोलणं टाळलं.