सनाकडे तीन मोबाईल होते, इतर दोन फोन कुठे ? सना खानच्या आईचा सवाल

By योगेश पांडे | Published: January 5, 2024 04:24 PM2024-01-05T16:24:25+5:302024-01-05T16:24:38+5:30

भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे.

Sana had three mobile phones, where are the other two phones? | सनाकडे तीन मोबाईल होते, इतर दोन फोन कुठे ? सना खानच्या आईचा सवाल

सनाकडे तीन मोबाईल होते, इतर दोन फोन कुठे ? सना खानच्या आईचा सवाल

योगेश पांडे

नागपूर :
भाजप पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणातील गूढ अद्यापही कायम आहे. मध्यप्रदेशातील मुख्य आरोपी अमित साहू याच्या घरातून पोलिसांना एक मोबाईल व लॅपटॉप सापडला होता. संबंधित मोबाईल सना यांचाच असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र सना यांच्याकडे तीन मोबाईल होते. उर्वरित दोन मोबाईल कुठे आहेत असा सवाल करत ते मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन सना यांच्या आई मेहरून्निसा यांनी केले आहे.

ऑगस्ट महिन्यात अमित साहूने पैशांच्या वादातून सना खान यांची जबलपूर येथील निवासस्थानी हत्या केली होती व त्यानंतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे शव हिरन नदीत फेकले होते. या घटनेला पाच महिने झाले आहेत. चौकशीदरम्यान अमित साहूने चारही मोबाईल नष्ट करण्यासाठी धर्मेंद्र या सहकाऱ्याला दिल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अमित साहूच्या आईच्या घरी तपासणी केली असता तेथे एक मोबाइल व लॅपटॉप आढळला आहे. हा मोबाइल व लॅपटॉप अमितने तेथे नेऊन ठेवला होता. आता तो मोबाइल सना खान यांचा तर नाही, तसेच लॅपटॉपमध्ये नेमके काय आहे याचा शोध सायबरतज्ज्ञांच्या मदतीने घेण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या फोनमधून काही फोटो व कॉन्टॅक्ट समोर आले आहेत.

तो फोन सना यांचाच असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे. सनाकडे एकूण तीन मोबाईल फोन होते .दोन आरोपींनी अजूनही लपवून ठेवले आहेत व ते पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी मेहरुन्निसा यांनी केली आहे. नागपूर पोलिसांच्या पथकाला एकच फोन आढळला आहे. सायबर सेलकडून तपास सुरू आहे. मात्र उर्वरित फोन कुठे आहेत. आरोपी अमित साहू अद्यापदेखील पोलिसांची दिशाभूल करत आहे. त्याने फोन व लॅपटॉपबाबत काहीच माहिती दिली नव्हती. धर्मेंद्र, कलमेश पटेल हे सगळेच वेगवेगळे बयाण देत आहेत. अमित साहूने अगोदर दावा केला होता की चार फोन धर्मेंद्रला दिले होते. मग आता फोन कसा सापडला याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असेदेखील त्या म्हणाल्या.

अमितकडून वारंवार दिशाभूल

अमितविरोधात नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर त्याला ताब्यात घेतले व ३० डिसेंबरपासून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र अमितकडून सुरुवातीपासूनच पोलिसांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्याने धर्मेंद्रला चार मोबाईल दिल्याचे सांगितले, तर धर्मेंद्रने दोन मोबाईल नष्ट केल्याची माहिती दिली. त्यानंतर आता अमितच्या एका घरातून मोबाईल सापडला आहे. एकूणच त्याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी सना खानच्या कुटुंबियांनी केली आहे.

Web Title: Sana had three mobile phones, where are the other two phones?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.