धनदांडग्यांचे महिलेसोबत अश्लील व्हिडीओ काढून सनाचा मारेकरी करायचा 'ब्लॅकमेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:14 PM2023-08-21T12:14:08+5:302023-08-21T12:22:15+5:30
नागपूर-जबलपूरच्या साथीदारांचाही गुन्ह्यात सहभाग : मानकापूर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा
नागपूर : सना खान हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी व जबलपूर येथील कुख्यात गुन्हेगार अमित ऊर्फ पप्पू साहू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित साहूसह धर्मेंद्र यादव नावाच्या गुन्हेगारालाही शनिवारी अटक करण्यात आली होती.
मानकापूर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार शुभांगी वानखेडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अमित साहूने जबलपूर आणि नागपूर येथील त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका ३५ वर्षीय पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती व तिच्यावर दबाव टाकून त्याने तिला अनेक ओळखीच्या लोकांकडे पाठविले. तेथे त्याने तिला त्यांच्यासोबत अश्लील व्हिडीओ व फोटो काढायला लावले. त्या फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून अमित साहूने नागपुरातील अनेकांना बदनामीची भीती दाखवून ब्लॅकमेल केले व पैसे उकळले. अशा पद्धतीने आरोपींनी नागपुरातील अनेकांना गंडा घातला.
अमित साहूच्या चौकशीदरम्यान ही बाब समोर आली. त्याआधारे अमित साहू आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणी, ब्लॅकमेल, गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा आणखी सखोल तपास झाल्यास नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भूकंप होऊ शकतो. या प्रकरणात बदनामीच्या भीतीने तक्रारीसाठी कुणीही पुढे आलेले नाही. अमित साहूने मध्य प्रदेशातील राजकीय वर्तुळातीलदेखील अनेकांना अशा पद्धतीने गंडा घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर व जबलपुरात टोळीच
लोकांना ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटमध्ये ओढणे व त्यांना बदनामीची भीती दाखवून पैसेवसुली करणे यासाठी अमित साहूने नागपूर व जबलपुरात लोकच ठेवले होते. त्याच्या या टोळीत काही व्यावसायिक गुन्हेगारदेखील होते. ३५ वर्षीय महिलेवर दबाव आणून या लोकांनी नेमके किती लोकांना फसविले व किती पैसे उकळले याचा शोध सुरू आहे. सायबर पथकाच्या माध्यमातूनदेखील तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजकीय, उद्योग वर्तुळात खळबळ
दरम्यान, अमित साहू व त्याच्या साथीदारांनी प्रमुखत: नागपूर, जबलपूर व मध्य प्रदेशमधील महत्त्वाच्या शहरांमधील राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना टार्गेट केले होते. संबंधित महिलेला जाणुनबुजून त्यांच्याकडे पाठवून ते घाणेरडे फोटो किंवा व्हिडीओ काढून घ्यायचे. बदनामीच्या भीतीने कुणीच तक्रारीसाठी समोर आले नव्हते. आता पोलिसांनी पोलखोल केल्यानंतर राजकीय व उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे.