विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला सनद जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 11:06 AM2023-01-14T11:06:27+5:302023-01-14T11:09:29+5:30

२०२० मध्ये वर्धा येथून मिळविली एलएलबी पदवी; तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी चालविते आधार नावाची संघटना

Sanad issued to Shivani Surkar first third gender lawyer in Vidarbha | विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला सनद जारी

विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला सनद जारी

googlenewsNext

नागपूर :विदर्भातील पहिली तृतीयपंथी वकील शिवानी सुरकारला शुक्रवारी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाच्या वतीने सनद जारी करण्यात आली. शिवानी रामनगर, वर्धा येथील रहिवासी असून तिने २०२० मध्ये एलएलबी पदवी मिळविली आहे.

शिवानी तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी लढण्यासाठी आधार नावाची संघटना चालविते. दरम्यान, तिला विविध कायदेविषयक अडचणी आल्या. त्यामुळे ती संघटनेचे कार्य वेगात पुढे घेऊन जाऊ शकली नाही. तिने वडिलांना ही अडचण सांगितली असता त्यांनी तिला कायद्याचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. करिता, तिने लगेच तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला व हे शिक्षण यशस्वीपणे पूर्णही केले. शिवानीचा मोठा भाऊदेखील वकील आहे. एलएलबीपूर्वी तिने बी.कॉम. व एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

वडिलांच्या निधनामुळे आली होती निराशा

शिवानीच्या वडिलांचे २०२१ मध्ये आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यामुळे तिने निराश होऊन वकिली करण्याचा विचार सोडून दिला होता; परंतु, तृतीयपंथीयांविषयीच्या चिंतेने ती पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाली. वकिलीची सनद मिळाल्यानंतर तिचे मनोबलही वाढले आहे. ती वकिलीचा अनुभव घेण्यासाठी मुंबईला गेली होती; पण कोरोनामुळे तिला परत यावे लागले.

विनयभंगाचे कलम तृतीयपंथीयांनाही लागू व्हावे

सध्या भारतीय दंड विधानातील विनयभंगाचे कलम महिलांकरिता लागू आहे. हे कलम तृतीयपंथीयांनाही लागू व्हावे, अशी शिवानीची मागणी आहे. त्याकरिता, मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याची माहिती शिवानीने ‘लोकमत’ला दिली. तसेच, तृतीयपंथीयांना त्यांचे सर्व अधिकार मिळावे, याकरिताही न्यायालयात लढणार असल्याचे सांगितले.

तृतीयपंथीयांना प्रेरणा मिळेल

वकील झालेली शिवानी तृतीयपंथीयांसाठी आदर्श ठरली आहे. तिच्यामुळे इतर तृतीयपंथीयांना उच्च शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल. ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. त्यांचा मानसन्मान वाढेल.

- ॲड. अनिल गोवारदीपे, माजी अध्यक्ष, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा

Web Title: Sanad issued to Shivani Surkar first third gender lawyer in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.