वाजायला लागले सनई-चौघडे, २०० लोकांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:13 AM2021-08-17T04:13:51+5:302021-08-17T04:13:51+5:30
- मंगल कार्यालय संचालकांमध्ये आनंद, बॅण्डवाले मात्र निराश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या सत्रात विवाहादी कौटुंबिक सोहळ्यांमधील ...
- मंगल कार्यालय संचालकांमध्ये आनंद, बॅण्डवाले मात्र निराश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या सत्रात विवाहादी कौटुंबिक सोहळ्यांमधील आनंदावर विरजण पडले होते. नाईलाजास्तव नागरिकांनी काळाची गरज म्हणून हे आनंदी सोहळे घरच्या घरी म्हणा वा कठोर निर्बंधात पार पडले. यामुळे मात्र विवाहसोहळे, मौंज, वाढदिवस आदींवर निर्भर असलेला व्यवसाय पार मोडकळीस आला. दीर्घकाळानंतर शासनाने या क्षेत्रावरील निर्बंध उठविल्याने नागरिकही आनंदाने सोहळे साजरे करीत आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयांचे बुकिंग वाढले आहे.
लग्नसमारंभातील अटी
* लॉनमध्ये २०० लोकांची मर्यादा.
* सभागृहात १०० लोकांची मर्यादा.
* साधारणत: तीन तासात कार्यक्रम आटोपावे.
* रात्री १० वाजताच्या आधी कार्यक्रम आटोपावे.
विवाहमुहूर्ताच्या तारखा
ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी चातुर्मासातील अडीअडचणींच्या मुहूर्तांसोबतच नियमित व शास्त्रानुसार उत्तम मुहूर्त सांगितले आहेत. सोबतच गुरु व शुक्र अस्तकाळातील मुहूर्तही सांगितले आहेत.
चातुर्मासातील तारखा (अस्त काळातील गरज म्हणून) -
ऑगस्ट - १८, २०, २१, २६, २७
सप्टेंबर - १६ (या तारखेनंतर पितृपक्ष, पितृपक्षात विवाहसोहळे होत नाहीत.)
ऑक्टोबर - ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४
नियमित मुहूर्त (तुळशीविवाहानंतर)
नोव्हेंबर - २०, २१, २९, ३०
डिसेंबर - १, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१
शास्त्रानुसारचे उत्तम मुहूर्त
जानेवारी - २२, २३, २४, २६, २७, २९
फेब्रुवारी - ५, ६, ७, १०, १६, १७
मार्च - २३, २५, २६, २८, २९
गुरु-शुक्राच्या अस्तकाळातील मुहूर्त (अस्त दोषाचे)
फेब्रुवारी - २०, २१, २२, २३, २४, २५
मार्च - ४, ५, ९, १०, २०
रोजीरोटी सुरू झाली याचा आनंद
लॉकडाऊनमधील निर्बंधामुळे आमचीच नव्हे तर मंगल कार्यालयांवर विसंबून असलेल्या लहान-मोठ्या व्यावसायिकांचा धंदा चौपट झाला होता. आता शासनाने निर्बंध उठविले आणि सर्वत्र आनंद पसरला आहे. रोजीरोटी सुरू झाल्याने जगण्याचा प्रश्न मिटला आहे. आता पुन्हा लॉकडाऊन लागू नये, याची काळजी आपणा सर्वांचीच आहे.
- विनोद कनकदंदे, नागपूर लाॅन ॲण्ड हॉल असोसिएशन
बॅण्डवाल्यांना रोजगार नाहीच
बॅण्डवाल्यांचा सीझन उन्हाळ्यात असतो. पावसाळ्यात विवाहादी सोहळे होतीलही तरी बॅण्डवाल्यांची बुकिंग नसते. हेच निर्बंध दीड महिन्याआधी उघडले असते तर थोडीथोडकी कमाई हाती पडली असती. पावसाळ्यानंतर होणाऱ्या विवाहांवर आता आम्ही विसंबून आहोत.
- अभिषेक इंगळे, मंगलदीप बॅण्ड
......................