पाच मिनिटात २८ विषय मंजूर
By admin | Published: January 5, 2016 03:15 AM2016-01-05T03:15:02+5:302016-01-05T03:15:02+5:30
शहरातील विकास कामात महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी अवघ्या
नागपूर : शहरातील विकास कामात महत्त्वाची भूमिका असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी अवघ्या पाच मिनिटात २८ विषयांना मंजुरी देण्यात आली. चर्चा न होता महत्त्वाच्या विषयांना मंजुरी दिली जात असल्याने समितीतील भाजप सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदारांच्या आग्रहावरून हा प्रकार सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे.
समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचे असल्याचे कारण पुढे करून सायंकाळी ५ वाजता बैठक सुरू केली आणि ५.०५ मिनिटांनी ती संपवली. त्याचवेळी काही सदस्य समिती कक्षाजवळ पोहोचले. मात्र, त्यांना बैठक संपल्याची माहिती देण्यात आली. स्थायी समितीपुढे अनेकदा अडचणीचे विषय मंजुरीसाठी येतात. अशा विषयावर चर्चा होण्याची गरज असते. परंतु चर्चा न होताच बैठकीत महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे सिंगारे सायंकाळी ६ वाजता कार्यालयात होते. प्रभागातील कामांना मंजुरी मिळावी म्हणून सदस्य उघड विरोध करण्यासाठी पुढे येत नाहीत.
वर्षभराने महापालिकेची निवडणूक होणार असल्याने प्रभागातील विकास कामे मार्गी लागावी यासाठी सदस्यांनी विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे दिले आहेत. परंतु बैठकीत सदस्यांना प्रस्ताव मांडण्याची संधीच दिली जात नाही. काही विशिष्ट नगरसेवकांचीच कामे होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. बैठक काही मिनिटात संपवल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अनुषंगाने समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही. (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र विकास आखड्याला मंजुरी
४पारडी भागातील श्री भवानी मंदिर, पुरातन श्री गणेश मंदिर व मुरलीधर मंदिराला ‘क’ तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे. या मंदिरांच्या विकासासाठी १२ कोटी ६८ लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
स्मार्ट सिटी जनजागृती प्रस्ताव स्थगित
४केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा विकास अराखडा व अन्य विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यासाठी महापालिकेने कंपनीची नियुक्ती केली आहे. परंतु स्मार्ट सिटी जनजागृती प्रस्तावावर चर्चा शक्य नसल्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला आहे.