घरकुलाच्या नावावर रेतीची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:08 AM2021-03-05T04:08:58+5:302021-03-05T04:08:58+5:30

मंगेश तलमले लाेकमत न्यूज नेटवर्क खात : घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना राॅयल्टी देण्याचा ...

Sand dune in the name of the household | घरकुलाच्या नावावर रेतीची चाेरी

घरकुलाच्या नावावर रेतीची चाेरी

Next

मंगेश तलमले

लाेकमत न्यूज नेटवर्क

खात : घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना राॅयल्टी देण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे रेतीची उचल करण्यासाठी तलाठी ट्रॅक्टर मालकाला टाेकन देते. ट्रॅक्टर मालक या टाेकन रेतीची उचल करून एक ते दाेन ब्रास रेती लाभार्थ्यांना देताे आणि त्याच टाेकनवर पुन्हा रेतीची उचल करून ती रेती इतर बांधकाम करणाऱ्यांना देत असल्याने यात शासनाचा महसूल बुडताे. हा प्रकार माैदा तालुक्यात खुलेआम सुरू असून, ट्रॅक्टर मालक सूर नदीच्या पात्रातून रेतीची उचल करीत आहेत.

पंतप्रधान घरकुल व इतर याेजनांतर्गत शासनाने गरजूंना घरकुले मंजूर केली आहेत. घरकुलांच्या बांधकामासाठी रेतीची आवश्यकता असून, लाभार्थ्यांना महागात रेती खरेदी करणे परवडत नाही. रेती बाजारभावाप्रमाणे खरेदी केल्यास मिळणाऱ्या अनुदानाच्या तुलनेत बांधकाम खर्च वाढताे. यावर पर्याय म्हणून लाभार्थ्यांच्या मागणीवरून राज्य शासनाने प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास रेती माेफत देण्याचा निर्णय घेतला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभागावर साेपविली. त्यासाठी तलाठ्यांकडून ट्रॅक्टर मालकांना रेती उचल करण्यासाठी टाेकन दिले जाते.

शासनाचा हा निर्णय लाेककल्याणकारी असला तरी काहींनी यात अतिरिक्त पैसा कमविण्याची शक्कल लढविली. खात (ता. माैदा) परिसरातील घरकुलाच्या बांधकामासाठी सूर नदीच्या पात्रातून याच टाेकनवर रेतीची उचल केली जाते. टाेकन प्राप्त हाेताच ट्रॅक्टर मालक त्या टाेकनचा वारंवार वापर करीत खुलेआम रेतीचाेरी करीत आहेत. ही रेती रेल्वे, रस्ते व इतर बांधकाम करणाऱ्यांना विकली जाते. या रेतीची उचल विना राॅयल्टी असल्याने ती लाभार्थ्यांऐवजी इतरांना विकल्यास शासनाला त्या रेतीची राॅयल्टीदेखील मिळत नसल्याने शासनाचे नुकसानही हाेते. याकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

...

कारवाई टाळण्यासाठी टाेकनचा वापर

तलाठ्याकउून टाेकन प्राप्त झाल्यानंतर ट्रॅक्टर मालक रेतीची उचल करायला सुरुवात करताे. एका टाेकनवर एक ब्रास रेतीची उचल करणे बंधनकारक असते. त्यामुळे ट्रॅक्टरमालकाला पाच ब्रास रेतीसाठी पाच टाेकन दिले जाते. ट्रॅक्टरमालक पहिल्या ट्रिपमधील रेती घरकुल लाभार्थ्याला देताे. त्यानंतर त्याच्याकडे असलेले टाेकन कुणीही परत घेत नाही. त्यामुळे नंतरच्या ट्रिपची रेती इतर बांधकाम करणाऱ्यांना १,२०० ते १,५०० रुपये प्रति ब्रास किंवा त्यापेक्षा अधिक दराने विकताे. महसूल व पाेलीस प्रशासनाने रेतीवाहतुकीचा ट्रॅक्टर पकडल्यास कारवाई टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरकुल लाभार्थ्यांचे टाेकन दाखवून पळवाट काढली जाते.

...

ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले, त्या अर्जांना मंजुरी देऊन रेती उचल करण्याचे टाेकन दिले. टाेकन ही एकप्रकारची राॅयल्टीच आहे. ट्रॅक्टर मालकाने एका टाेकनवर रेतीची एकदाच उचल करावी. वारंवार उचल करून रेती विकू नये. या प्रकाराची तातडीने चाैकशी केली जाईल. ट्रॅक्टर मालक या टाेकनचा गैरवापर करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल.

- प्रशांत सांगडे,

तहसीलदार, माैदा.

Web Title: Sand dune in the name of the household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.