भंडाऱ्यात रेतीचोरीचा कहर; हजारो ट्रकचा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 10:42 AM2023-06-19T10:42:48+5:302023-06-19T10:44:49+5:30
तस्कारांनी पोखरले घाट : रस्ते खराब, चौक्या बंद, पोलिस आणि प्रशासनही शांत, महसुलाची लूट
नागपूर : भंडारा जिल्ह्याला वैनगंगेच्या रूपात वरदान भेटले आहे. याचा फायदा रेती तस्कर घेत आहेत. त्यात पोलिसासह महसूल विभागाचे हात ओले होत आहे. लोकमतने भंडारा जिल्ह्यातून होत असलेल्या रेतीचोरीचा आढावा घेतला असता, घाट मालकांची मनमानी दिसून आली, त्यांनी पोलिस व प्रशासनाला हाताशी धरून करोडो रुपयांच्या महसुलाची लूट सुरू केली आहे.
भंडारा प्रशासनाने घाटांचा लिलाव केल्यानंतर काही चोरीचे घाटही तयार झाले आहेत. ज्या घाटांना कुठलीही परवानगी नसतानाही तेथून रेतीचा उपसा करून, चोरीच्या रेतीची वाहतूक केली जात आहे. मोहाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कोथुरना या चोरीच्या घाटातून हा सर्व प्रकार सुरू आहे. येथे नदीतून रेतीचा उपसा करून स्टॉक ठेवला जात आहे. ५ ते ६ हजारांत ८ ब्रास रेती मिळत आहे. येथे रॉयल्टीचा काहीही संबंध नाही. बेटाडा घाट नईम नावाचा व्यक्ती ऑपरेट करीत आहे. हा घाटही मोहाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या घाटातून रॉयल्टीने कमी व विदाउट रॉयल्टीने रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या घाटावरून ज्या मार्गाने वाहतूक होते, त्या मार्गावर पोलिसांनी नदीच्या काठावर चौकी लावली आहे, पण ही चौकी केवळ नावाचीच आहे. ती बंद असल्याचे दिसून आले. रोहा घाटावरूनही रेतीची वाहतूक भंडारा शहरातून नागपूरकडे येत आहे. रेतीच्या वाहतुकीमुळे भंडारा जिल्ह्यातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शिवनाडा, नांदेड घाटातून रेतीची वाहतूक सुरू झाल्यामुळे हजारो ट्रकांचा ताफा घाटावर दररोज पोहोचत आहेत. या घाटातून दररोज दोन ते तीन हजार ब्रास रेतीची वाहतूक अनधिकृतपणे होत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.
- रॉयल्टीची रेती कमी, डब्ल्यूआर ट्रक भरून
सरकार रॉयल्टीने रेती ६७० रुपयांमध्ये देत आहे, पण नांदेड व शिवनाडा घाटावर रॉयल्टीच्या रेतीचे प्रती ब्रास १,३०० रुपये आकारले जात आहे. सेतू केंद्रावरून रॉयल्टी काढल्यानंतर घाट मालक कमी रेती देत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, या तक्रारी ऐकून घ्यायला प्रशासन तयार नाही. मात्र, डब्ल्यूआर रेती १० हजारांत ७ ते ८ ब्रास म्हणजे ट्रक भरून मिळत आहे. डब्ल्यूआर रेतीची वाहतूक ही रात्रीलाच होत आहे.
- संपूर्ण जिल्हा एन्ट्रीच्या जाळ्यात
गोबारवाई घाटातून देवलापार रामटेक मार्गे रेती येत आहे. शिवनाडा घाटातून पवनी, भिवापूर, उमरेड मार्गाने नागपुरात रेती येत आहे. कोथुरना, बेटाडा, रोहा मार्गाने येणारी रेती भंडारा शहरातून येत आहे. घाट मालकांनी पोलिस व प्रशासनाच्या एन्ट्री सुरू केल्या आहेत. सर्वांचे हात ओले होत असल्याने, कुणीही कारवाईसाठी पुढे येत नाही. रेतीच्या तस्करीत घाट मालकांची माफियागिरी सुरू आहे.
- ब्रह्मपुरीच्या सोंदरी घाटाने वाढविले दर
निसर्गाच्या रूपाने रेतीचे वरदान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीलाही मिळाले आहे. या ब्रह्मपुरीतील सोंदरी घाट मालकाने अगोदरच कराराचे उल्लंघन केले आहे. मुदत संपल्यानंतरही उपसा करण्यात येत असून, आता चोरीची रेतीही ८ हजार रुपयांवरून १४ हजार रुपये केली असल्याचे वाहतूकदारांनी सांगितले.