घाटाची मुदत संपल्यानंतरही रेतीचा उपसा सुरू; रॉयल्टीच्या तुलनेत २० ते ३० पट रेतीचा उपसा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 12:44 PM2023-06-12T12:44:53+5:302023-06-12T12:46:50+5:30
नदीची वाळू संपेल, पण घाटमालकाची रॉयल्टी नाही
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील नदीतून रेतीच्या उपशाची मुदत संपली आहे. मात्र, प्रशासनाचे डोळेझाक असल्याने अजूनही नदीतून उपसा सुरूच आहे. घाटाच्या लिलावात झालेल्या करारानुसार उचल करणाऱ्या रेतीपेक्षा २० ते ३० पटीने अधिक रेतीचा उपसा आतापर्यंत झाला आहे. नद्यांमध्ये १० ते १५ फुटांचे खड्डे पडलेले आहे. लाखो ब्रास रेतीची उचल झाल्यानंतरही घाटमालकाकडे अजूनही रॉयल्टी शिल्लकच आहे. दररोज या घाटांवरून २०० ते २५० ट्रक चोरीची रेती नागपूर व परिसरातून येत आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील सोंदरी घाटाचा लिलाव ३८८७ ब्रास रेतीच्या उपशाचा झाला होता. हा घाट मे. दक्ष ट्रेडर्स यांना मिळाला होता. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार या घाटावरून ५० हजार ब्रास रेतीचा येथून उपसा झाला आहे. मोठमोठे खड्डे नदीमध्ये पाडलेले आहे. बोडेगाव रेतीचा घाटातून ७०६७ ब्रास रेतीची उचल करायची होती. हा घाट मे. प्रशांत ट्रेडर्स या कंपनीला मिळाला होता. रणमोचन घाटातून ७०६७ ब्रास रेतीची उचल करायची होती. हा घाट मे. अनुजकुमार अग्रवाल यांना लिलावात मिळाला होता. खरकाळा घाटातूनही ७०६७ मेट्रिक टन रेतीची उचल करायची होती. हा घाट मे. के. डी. रिसोर्स प्रा. लि. रिंकू महेंद्रलाल व्होरा यांना लिलावात मिळाला होता.
चिचगाव घाटातून १११३१ ब्रास रेतीची उचल करायची होती, हा घाटही रिंकू व्होरा यांना लिलावात मिळाला होता. करारानुसार १० जूनपर्यंत नदीच्या पात्रातून उपसा करायचा होता, तर स्टॉकवरून विक्रीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. पण, या घाटांवर अजूनही रेतीचा उपसा सुरूच आहे. सरकारने रेतीच्या घाटाचे नवीन धोरण राबविण्यापूर्वी नागपूर व भंडारा जिल्ह्यातील घाटांतून रेतीच्या उपशाला निर्बंध घातले होते. त्यामुळे ब्रम्हपुरी व सिंदेवाही येथूनच रेती नागपुरात येत होती. चार महिन्यांच्या कालावधीत पोलिस, प्रशासनाच्या मदतीने करारापेक्षा कितीतरी पटीने रेतीचा उपसा झाला असून, चोरीची रेती नागपुरात आली आहे.
- तरीही रॉयल्टी शिल्लकच
लाखो ब्रास रेतीचा उपसा होऊन रेतीची वाहतूक नागपूरसह इतर जिल्ह्यात झाल्यानंतरही या घाटमालकांकडे अजूनही रॉयल्टी शिल्लक आहे. कारण घाटमालक रॉयल्टीची रेती महागात विकत असून, चोरीची रेती स्वस्तात देत आहे. चोरीच्या रेतीला रॉयल्टी नसल्याने घाटमालकांकडे रॉयल्ट्या शिल्लक आहे, असे रेती वाहतूक करणाऱ्यांनी सांगितले.
- प्रशासनाची निष्क्रियता
ब्रम्हपुरी व सिंदेवाही येथील रेती घाटावरून उपशाची मुदत संपली असून, साठ्यावरून विक्री ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. पण, अजूनही रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने साठ्यावर टाकण्याचे काम सुरू आहे. रेती चोरीच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाचे धोरण निष्क्रिय असल्याने १० जूननंतरही त्यांनी काहीच पाऊल उचलले नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले.
- हे पंटर करतात प्रशासनाला मॅनेज
ब्रम्हपुरी, सिंदेवाहीतील घाटातून येणारी रेती काम्पा, शंकरपूर, भिसी मार्गाने उमरेड होत नागपुरात येते. दुसरा मार्ग नागभिड, भिवापूर उमरेड आहे. ही चोरीची रेती पकडू नये म्हणून ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील प्रशासन व पोलिसांना मॅनेज करण्याचे काम, चोरीच्या वाहतुकीला राण मोकळे करून देण्याचे काम जितू नखाते, किशोर बालपांडे, मंडल या पंटरकडून होत आहे. ही मंडळी रेतीघाटासह संपूर्ण प्रशासन मॅनेज करीत असल्याचे पोलिस आणि प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.