वाळू माफियांची तहसीलदाराला दमदाटी
By admin | Published: March 30, 2016 03:05 AM2016-03-30T03:05:08+5:302016-03-30T03:05:08+5:30
वाळू माफियांनी नायब तहसीलदारांशी वाद घालून त्यांना दमदाटी करीत वाळूचे ट्रक घेऊन पळ काढला.
गुन्हा दाखल : ट्रक महेश वैद्य यांच्या मालकीचे
नागपूर : वाळू माफियांनी नायब तहसीलदारांशी वाद घालून त्यांना दमदाटी करीत वाळूचे ट्रक घेऊन पळ काढला. मंगळवारी सकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास कोराडी ते सुरादेवी मार्गावर ही घटना घडली.
या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची माहिती कळाल्याने नायब तहसीलदार गणेश देवराम सुपे (वय २७) आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर होते. ट्रक क्रमांक एमएच ४०/वाय २८५९ चा चालक नूरसिंग धानसिंग खुशराम (वय ३५, रा. शिवनी), ट्रक क्रमांक एमएच ३१/डीएस २०२८ चा आरोपी चालक बबलू जगन फकीरडे (वय ४२, रा. मकरधोकडा) आणि ट्रक क्रमांक एमएच ४०/४२५९ चा चालक नियाज फकीर मोहम्मद शेख (वय २३, रा. नागपूर) हे तिघे प्रत्येकी ५ ब्रास रेती (एकूण १ लाख १८ हजार किमतीची) चोरून नेत असल्याचे आढळल्याने तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले. यावेळी आरोपींनी वाद घातला. शिवीगाळ आणि दमदाटी केल्यानंतर आरोपी चोरीच्या रेतीसह ट्रक घेऊन पळून गेले. हे ट्रक कोराडीच्या महेश वैद्य यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तहसीलदारांनी ट्रकचालक आणि मालकाविरुद्ध कोराडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)