रेतीमाफियांकडून शासकीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
By योगेश पांडे | Published: January 15, 2024 04:55 PM2024-01-15T16:55:17+5:302024-01-15T16:56:17+5:30
१४ जानेवारी रोजी साडेसहा वाजताच्या सुमारास अनिल ब्रम्हे (५३) हे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा फाटा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत होते.
नागपूर : रेती तस्करी करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत असताना तहसील कार्यालयातील मंडल अधिकाऱ्याला घेरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
१४ जानेवारी रोजी साडेसहा वाजताच्या सुमारास अनिल ब्रम्हे (५३) हे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहादुरा फाटा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत होते. त्यावेळी ट्रकचालक अशरफ खान एलाई खान (२९, खरबी) व ट्रकचा मालक जावेद खान हमीद खान (३२, बाबा फरीदनगर) यांनी पाच ते सहा गुंडांना तेथे फोन करून बोलविले. त्यांनी एकत्रितपणे ब्रम्हे यांना घेराव घातला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
जर कारवाई सुरूच ठेवली तर जीव घेऊ अशी धमकीदेखील दिली. त्यानंतर आरोपी नंबरप्लेट नसलेल्या क्रेटा व ब्रेझा या कार्सने पळून गेले. ब्रम्हे यांनी लगेच वरिष्ठांना या प्रकाराची माहिती देत वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला व शोधमोहीम राबविली. ट्रकचालक व ट्रकमालक या दोघांनाही अटक करण्यात आली तर इतर गुंडांचा शोध सुरू आहे.