मेडिकलमध्ये ‘आराम’ करत होता वाळूमाफिया; आजारपणाच्या नावाखाली १३ दिवस काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 09:43 PM2023-03-02T21:43:10+5:302023-03-02T21:43:43+5:30
Nagpur News वाळू तस्करीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावणारा कुख्यात गुड्डू खोरगडे एमपीडीएअंतर्गत तुरुंगात असतानाही आजारपणाच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून कारवाया चालवत होता.
नागपूर : वाळू तस्करीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावणारा कुख्यात गुड्डू खोरगडे एमपीडीएअंतर्गत तुरुंगात असतानाही आजारपणाच्या नावाखाली शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून कारवाया चालवत होता. आजारपणाचे कारण करत १३ दिवसांपासून तो दवाखान्यात होता. पोलिसांनी कडक शब्दांत पत्र लिहिल्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी गुड्डूला घाईघाईत सुटी दिली. या प्रकरणामुळे मेडिकलमधील डॉक्टरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गुड्डू हा जिल्ह्यात वाळूची तस्करी करायचा. वाळू तस्करीतून त्याने करोडोंची संपत्ती कमावली आहे. चार महिन्यांपूर्वी गुड्डूला एमपीडीएअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याची रवानगी कोल्हापूर कारागृहात होणार होती. एमपीडीए पुनरावलोकन समितीसमोर हजर केल्यामुळे गुड्डूला सध्या नागपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्याने मूळव्याधीच्या समस्येचे कारण दिले व शस्त्रक्रियेच्या नावाखाली १६ फेब्रुवारीला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार-पाच वेळा ऑपरेशनची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, वेगवेगळी कारणे सांगून ती पुढे ढकलण्यात आली होती. गुड्डूने मोबाइलच्या साह्याने मेडिकलमधूनच आपले उपक्रम सुरू केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना तपासाच्या सूचना केल्या. सुदर्शन यांनी अधिष्ठात्यांना पत्र लिहून गुड्डू मेडिकलमधून गुन्हेगारी कारवाया करत असल्याची शंका व्यक्त केली व त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या आजाराशी संबंधित कागदपत्रांसह पोलिस आयुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले. हे पत्र मिळताच डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचे सत्य समोर आल्यावर डॉक्टरांना आपल्याच अडचणी वाढण्याचा धोका दिसू लागला. त्यामुळे २८ फेब्रुवारीलाच गुड्डूला सुटी देऊन तुरुंगात पाठविण्यात आले. हे प्रकरण अंगावर शेकू नये, यासाठी मेडिकलच्या डॉक्टरांनी बुधवारी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. उपचाराच्या नावाखाली गुन्हेगारांना मदत करू नका, असा सल्ला पोलिस आयुक्तांनी यावेळी त्यांना दिला.