रेतीच्या टिप्परने चिरडले : गर्भवती पत्नीसह पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 09:18 PM2019-10-11T21:18:39+5:302019-10-11T21:20:57+5:30

गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जात असलेल्या पतीने त्याची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाचा मोटरसायकलला धक्का लागला आणि मोटरसायकलसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sand Tipper Crushed: Husband's death with a pregnant wife | रेतीच्या टिप्परने चिरडले : गर्भवती पत्नीसह पतीचा मृत्यू

रेतीच्या टिप्परने चिरडले : गर्भवती पत्नीसह पतीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गुमथळा गावाजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (गुमथळा) : गर्भवती पत्नीला डॉक्टरकडे तपासणीला घेऊन जात असलेल्या पतीने त्याची मोटरसायकल सर्व्हिस रोडवरून महामार्गावर घेताच उड्डाणपुलावरून वेगात आलेल्या टिप्परच्या डाव्या भागाचा मोटरसायकलला धक्का लागला आणि मोटरसायकलसह पती, पती दोघेही टिप्परच्या समोरच्या चाकाखाली आले. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा घटनास्थळीच तर पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पोटातील बाळदेखील बाहेर आले होते. हा भीषण अपघात मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - भंडारा महामार्गावरील गुमथळा (ता. कामठी) गावाजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.
विजय झनकलाल यादव (२९) व नीलू विजय यादव (२६) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. विजय हा मूळचा झपारा, जिल्हा शिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, तो साडेचार वर्षांपासून गुमथळा शिवारातील हल्दीराम कंपनीमध्ये वाहनचालक म्हणून काम करायचा. त्यामुळे तो पत्नी व पाच वर्षीय माही (मुलगी) यांना सोबत घेऊन गुमथळा येथील गोपाल मोहोड यांच्याकडे किरायाने राहायचा.
नीलू ही आठ महिन्यांची गर्भवती असल्याने तो तिला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी एमएच-३१/सीएक्स-००३८ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूर येथील डॉक्टरकडे जात होता. तो उड्डाणपुलाखालून डाव्या सर्व्हिस रोडने निघाला आणि उड्डाणपूल संपताच त्याने मोटरसायकल महामार्गावर घेतली. त्याचवेळी उड्डाण पुलावरून खाली उतरत नागपूरच्या दिशेने जात असलेल्या रेतीच्या एमएच-४०/एके-४०८० क्रमांकाच्या टिप्परच्या डाव्या भागाचा धक्का मोटरसायकलला लागताच नीलू चाकाखाली आली.
परिणामी, अंगावरून चाक गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, पोटातील बाळदेखील बाहेर आले होते. पायावरून चाक गेल्याने विजय गंभीर जखमी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि विजयला उपचारार्थ नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून नीलूचा मृतदेहही उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मधुकर गीते करीत आहेत.
पाच वर्षीय ‘माही’ अनाथ
विजय व निलूला पाच वर्षाची माही (मुलगी) आहे. ही गुमथळा येथील लिटिल स्टार कॉन्व्हेंटमध्ये शिकत असल्याने नागपूरला निघण्यापूर्वी विजयने तिला कॉन्व्हेंटमध्ये सोडले होते. अपघातात आपल्या आई व वडिलांचा मृत्यू झाल्याची तिला माहितीदेखील नव्हती. अपघात होताच त्याच्या झपारा येथील कुटुंबीयांना कळविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात विजयचे कुणीही नातेवाईक राहात नसल्याने कुटुंबीय येईपर्यंत माही घरमालक गोपाल मोहोड यांच्याकडेच होती. या अपघातामुळे ती अनाथ झाली.

Web Title: Sand Tipper Crushed: Husband's death with a pregnant wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.