Nagpur | सिव्हिल लाइन्समध्ये चंदन चोराला रंगेहाथ अटक; एक साथीदार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 01:58 PM2022-09-29T13:58:42+5:302022-09-29T14:00:13+5:30
घरमालकाची सतर्कता : २४ तासांत दोन तक्रारी
नागपूर : जिल्ह्यात चंदन चोरांची टोळी सक्रिय असून, बुधवारी पहाटे दोन चोरांपैकी एकाला सिव्हिल लाइन्स परिसरात रंगेहाथ अटक करण्यात आली. घरमालकाच्या सतर्कतेमुळे हा चोर ताब्यात आला. विशेष म्हणजे २४ तासांच्या आत चंदनाचे झाड चोरीला गेल्याची आणखी एक तक्रार पोलिसांकडे आली. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही घटना घडल्या.
सिव्हिल लाइन्स येथील घटाटे ले-आउट येथील गोकुळ बंगल्यात नरसिंह घटाटे (५०) हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घराच्या अंगणात औषधी वनस्पतींची नर्सरी व चंदनाची झाडेदेखील आहेत. त्यांच्याकडे मयूर नावाचा तरुण नर्सरीची देखभाल करतो. मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन इसम आले व त्यांनी नर्सरीची पाहणी करण्याच्या बहाण्याने चंदनाच्या झाडांचा फोटो काढला. मयूरला संशय आला व त्याने त्यांना हटकले. त्याने घटाटे यांना ही माहिती दिली. घटाटे यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोनावणे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ते झोपी गेले. बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना झाड कापण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिले असता दोन जण चंदनाचे झाड कापत होते. घटाटे यांनी तातडीने सोनावणे यांना फोन करून माहिती दिली. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पथक तेथे आले व त्यांनी चंदनचोराला रंगेहाथ पकडले. एक जण पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी आणखी एका झाडाची चोरी
दरम्यान, सिव्हिल लाइन्स परिसरातच मंगळवारी एका चंदनाच्या झाडाची चोरी झाली. राजलक्ष्मी मार्गावरील पंचरत्न अपार्टमेंट येथे दिलीप चंचानी यांचे घर आहे. चंचानी हे अमेरिकेत गेले आहेत व श्रवणकुमार मिश्रा यांच्याकडे पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. मागील बगिच्यात चंदनाचे झाडदेखील आहे. सोमवारी मिश्रा नेहमीप्रमाणे झाडांना पाणी टाकून निघून गेले. मंगळवारी सकाळी चौकीदाराचा त्यांना फोन आला व चंदनाचे झाड गायब असल्याचे सांगितले. मिश्रा यांनी जाऊन पाहिले असता दहा फूट उंचीचे चंदनाचे झाड तोडण्यात आले होते. मालकाच्या सांगण्यावरून त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.