संदीप जाधव यांनी स्वीकारला स्थायी समिती अध्यक्षपदाचा पदभार
By admin | Published: March 11, 2017 04:31 PM2017-03-11T16:31:28+5:302017-03-11T16:31:28+5:30
महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसली तरी ती सुधारण्याची ताकद पदाधिका-यांत आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधण्यात येतील. सोबतच कर वसुलीसाठी कठोर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जाधव यांनी शनिवारी दिली. मावळते अध्यक्ष बंडू राऊत यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे शहराचा विकास होत आहे. शहरातील अनधिकृत ले-आऊट नियमित करण्याच्या निर्णयासोबतच अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. पण, असे असले तरी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. शहरात सुमारे 6 लाख मालमत्ता आहेत. परंतु सर्व मालमत्तावर कर आकारणी होत नाही. यासाठी सर्व्हेक्षण करुन नव्याने कर आकारणी करावी लागेल.
मालमत्ता कर, पाणीपपट्टी व नगररचना विभागाच्या वसुलीवर अधिक भर दिला जाईल. मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करुन कठोर कारवाई करु, असा इशारा जाधव यांनी दिला. उत्पन्नात वाढ जाली तर नगरसेवकांना विकास कामांसाठी अधिक निधी उपलब्ध करता येईल.
महापालिकेच्या सर्व झोनचा दौरा करून कर वसुलीचे दिलेले उद्दिष्ट व प्रत्यक्षात झालेली वसुली याचा आढावा घेण्यात येईल. महापालिका आयुक्त लवकरच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यानंतर सर्व पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा करून स्थायी समिती २०१७-१८ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.
आश्वासनांची पूर्तता करू
भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात शहर विकासाचे आश्वासन दिले आहे. याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. वर्षभरात नागरिकांना याचा प्रत्यय येईल. लोकांनी दर्शवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही. अशी ग्वाही जाधव यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.