संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 08:09 PM2019-11-18T20:09:21+5:302019-11-18T20:34:58+5:30

महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

Sandeep Joshi new mayor of Nagpur | संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर

संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर

Next
ठळक मुद्देउपमहापौरपदी मनीषा कोठे तर सत्तापक्षनेते संदीप जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. प्रशासनावर त्यांची पकड असल्याने महापालिकेच्या कामांना गती मिळण्याची आशा आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मनीषा कोठे यांनी अर्ज भरला आहे. 


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून महापौरपदासाठी हर्षला साबळे यांनी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. बसपाकडून महापौरपदासाठी मोहम्मद इब्राहिम तौफिक अहमद यांनी तर उपमहापौरपदासाठी मंगला लाजेवार यांनी अर्ज दाखल केला आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. सभागृहातील संख्याबळ विचारात घेता जोशी हेच नागपूरचे ५३ वे महापौर होणार आहेत. नागपूरचे महापौरपद खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी अनेक जण इच्छुक होते. गेल्या आठवड्यापासून महापौरपदासाठी सत्तापक्षात रस्सीखेच सुरू होती. परंतु पक्षाने जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच उपमहापौरपद अपक्ष नगरसेवकाला दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र या पदासाठी मनीषा कोठे यांचे नाव निश्चित करण्यात आले.

नागपूर महापालिकेत २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत १५२ जागापैकी भाजपचे निर्विवाद बहुमतासह १०८ नगरसेवक निवडून आले होते. परंतु यातील एका नगरसेवकांचे निधन झाले तर एकाचे सदस्यत्व रद्द झाल्याने दोन जागा रिक्त आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ १०६ झाले आहे. काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. बसपाचे १० , शिवसेना २, राष्ट्रवादी १ तर अपक्ष १ असे संख्याबळ आहे. संख्याबळाचा विचार करता जोशी यांची महापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. 


जोशींनंतर तिवारी यांनाही मिळणार महापौरपद
महापौरपदावर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी या दोघांनी दावा केला होता. या दोघांचीच नावे आघाडीवर होती. यावर तोडगा म्हणून महापौरपदाचा कार्यकाळ विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला. संदीप जोशी यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी महापौर होणार आहेत. त्यांनी महापालिकेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. विधानसभा निवडणुकीत तिवारी यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी दावा केला होता. नागपूर शहरातील एका विधानसभा मतदारसंघातून उत्तर भारतीयाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दोन वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. याचा विचार करता या निवडणुकीत उत्तर भारतीयांची नाराजी नको म्हणून सव्वा वर्षानंतर तिवारी यांना महापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्याच कार्यकाळात महापालिकेची पुढील निवडणूक होणार आहे.

गडकरी- फडणवीस यांच्या मार्गदर्शनात निर्णय
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नवीन महापौर, उपमहापौर व सत्तापक्षनेते पदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळात सव्वा-सव्वा वर्ष महापौरपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीचे सव्वावर्ष संदीप जोशी महापौर असतील. तर त्यापुढील सव्वावर्ष दयाशंकर तिवारी हे महापौर राहतील, अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत दिली. महापौरपदाची संधी दोघांना देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पक्षाचे नेते शहराबाहेर असल्याने रविवारी कोअर कमिटीच्या बैठकीत महापौरपदाचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या त्रुटी दूर करून महापालिकेच्या आगामी निवडणुकीला भाजप सामोरे जाईल. सध्या असलेल्या १०८ जागांहून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार गिरीश व्यास व संदीप जाधव उपस्थित होते.

लोकशाहीत निवडणूक लढायला हवी
महापालिकेत गतकाळात काँग्रेसची सत्ता असताना भाजपकडून महापौरपदाची निवडणूक लढविली जात होती. त्यामुळे सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ नसले तरी लोकशाहीत निवडणूक लढायला हवी. यासाठी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे व राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी दिली. राज्याप्रमाणे महापालिकेतही शिवआघाडी व्हावी, यासाठी शिवसेनेचे कि शोर कुमेरिया यांच्या संपर्कात असल्याचे वनवे यांनी सांगितले.

शिवसेनेची भूमिका २२ तारखेला ठरणार
महापालिकेत शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. राज्यातील नवीन राजकीय समीकरण विचारात घेता महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तिकर यांच्याशी चर्चा करून महापौरपदाच्या निवडणुकीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया यांनी दिली.

अर्ज सादर करताना मान्यवरांची उपस्थिती
नवीन महापौर व उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली.  निगम सचिव हरीश दुबे यांनी सर्वांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले. महापौरपदासाठी संदीप जोशी यांच्या नावाला विद्यमान महापौर नंदा जिचकार ह्या सूचक तर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके अनुमोदक होते तर उपमहापौरपदाच्या उमेदवार मनिषा कोठे यांचे सूचक विद्यमान उपमहापौर दीपराज पार्डीकर व अनुमोदक स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे हे होते. यावेळी  आमदार कृष्णा खोपडे, आमदार गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र राज्य  इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम, उपसभापती प्रमोद तभाने,नागेश सहारे, प्रतोद दिव्या धुरडे, झोन सभापती राजकुमार साहु,  वंदना येंगटवार, माधुरी ठाकरे, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवारी होणार निवडणूक
शुक्रवारी २२ नोव्हेंबरला महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.  सुरुवातील पीठासीन अधिकाऱ्यांद्वारे नामनिर्देशनपत्राची छाननी केली जाईल. यानंतर उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यास वेळ दिला जाईल. पीठासीन अधिकाऱ्यांद्वारे उमेदवारांची नावे घोषित झाल्यानंतर आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येईल. यानंतर पीठासीन अधिकारी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या नावाची घोषणा करतील. 

Web Title: Sandeep Joshi new mayor of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.